मुंबई बातम्या

Mumbai Local: मुंबई लोकल कधी सुरू होणार?; मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती – Maharashtra Times

मुंबईः ‘मुंबई लोकल सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असून बाकी नोकरदारवर्ग आणि प्रवाश्यांना लोकलमध्ये कधी प्रवेश मिळणार याची प्रतिक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकलबाबत सूचक विधान केले आहे. देशभरात लॉकडाउन उघडण्याचे निर्णय घाईगडबडीत घेतले जात असले तरी महाराष्ट्रामध्ये अशा घाईगडबडीत निर्णय घेतले जाणार नाहीत,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लोकल साठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याचं संकेत दिले आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांमधील करोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी ठाण्यात आले होते. ठाणे महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शहराच्या स्थितीचा आढावा घेत गाफील न राहता उपाययोजनांची कामे सुरू ठेवण्याचा स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले. त्याचवेळी लोकलसेवेबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

अनलॉकवर सध्या ‘हेच’ औषध; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट

‘एकदा खुली केलेली सेवा पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घेऊनच निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामीण भाग आणि इतर शहरांमध्ये पुनश्च हरीओम म्हणत अनेक गोष्टी सुरू केल्या असल्या तरी ज्या गोष्टी सुरू करणे शक्य नाही त्या शक्य नाहीत,’ जिल्हांतर्गत प्रवास आणि लोकल सुरू करण्याच्या प्रश्नांच्या उत्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेत. त्यामुळे लोकलसेवेसाठी नागरिकांना आणखी काळ वाट पहावी लागणार असल्याचे संकेत दिले.

बापरे! राज्यात करोनाग्रस्त पोलिसांची संख्या १३ हजारांवर

दरम्यान, करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये लोकलसेवाही बंद करण्यात आली. त्यानुसार मुंबईत गेल्या चार महिन्यांपासून सामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंद आहेत. सध्या देशात आणि राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक कंपन्या, व्यवहार पूर्वपदावर येताना दिसत आहेत. या स्थितीत दूरवर उपनगरांत राहणाऱ्या नोकरदारांची लोकल नसल्याने मोठी कोंडी होत आहे.

महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून मुंबईतील उपनगरी लोकल मार्गांवर विशेष लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे असंख्य कर्मचारी उपनगरांत राहतात. या कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यात अडचणी येत असल्याने सरकारने लोकलसेवेची विनंती केली होती. त्यानुसार सध्या २३० विशेष लोकल धावत आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/cm-uddhav-thackeray-talking-about-mumbai-local/articleshow/77728137.cms