मुंबई बातम्या

मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला; मनसेचा आरोप – Maharashtra Times

मुंबई: करोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच मनसेनं थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलं आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे.

मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज दादर येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. ‘करोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारण करू नये. सर्वांना या संकटाशी एकजुटीनं लढायचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार करत होते. इतर पक्षही त्यावेळी करोनाच्या संकटाशी लढण्यात व लॉकडाऊनमुळं अडचणी आलेल्या जनतेला धीर देण्याच्या कामात व्यग्र होते. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना त्यावेळी भ्रष्टाचार करण्यात गुंतली होती असं आमच्या निदर्शनास आलं आहे, असं देशपांडे यांनी सांगितलं. ‘महापौर पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीनं गैरमार्गानं काम मिळवल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. ‘दुसऱ्या तिसऱ्या कोणाला काम न देता परस्पर एखाद्याला बोलावून अॅग्रीमेंट केलं जातं यातच सर्व काही आलं,’ असं देशपांडे म्हणाले.
वाचा: फडणवीसांनंतर आता सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

‘महापालिकेचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सभागृहही चालू दिले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना केवळ मुंबई महापालिकेचेच सभागृह बंद का,’ असा प्रश्नही देशपांडे यांनी केला. ‘या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही देशपांडे यांनी केली. पुत्र मोहातून शिवसेना बाहेर पडेल का, असं ट्वीटही देशपांडे यांनी केलं आहे.

वाचा: संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचंय? ‘या’ ट्वीटची तुफान चर्चा

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-covid-scam-mumbai-mayor-gives-covid-centre-contract-to-her-son-alleges-mns/articleshow/77651726.cms