मुंबई बातम्या

sushant singh case : सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; मुंबई पोलीस आयुक्त म्हणतात… – Maharashtra Times

मुंबईः सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर मुंबई पोलिस टीकेचे धनी ठरत आहेत. असं असतानाच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करणार की सीबीआय यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. मुंबई पोलिस या प्रकरणात कोणाला तरी वाचवण्याचे सातत्याने प्रयत्न करत आहे, असे आरोपही वेळोवेळी करण्यात आले. तर, यावरून राजकीय वातावरणही तापले होते. सर्वोच्च न्यायालयानंही या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोणताही तपास केला नाही फक्त चौकशी केली. आता या प्रकरणाशी निगडीत सर्व तपास सीबीआयचं करेल, असा निर्णय दिल्यानंतर हा मुंबई पोलिसांसाठी धक्का असल्याचं समजलं जातंय. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचाः सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता नाहक प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सल्ला

‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही त्याचा आभ्यास करू. त्यानंतर पुढे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ. आदेशाची प्रत पाठवण्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयातील आमच्या वकिलांसोबत चर्चा केली आहे,’ असं परमबीर सिंह म्हणाले.

मुंबई पोलिस नाही, CBI करणार सुशांतसिंह प्रकरणाचा तपास: सुप्रीम कोर्ट

दरम्यान, सीबीआयकडे तपास देण्याच्या मागणीला नकार देणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात प्रत्येक वेळी बाजू मांडताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं करत आहेत. सीबीआय तपासाची गरज नाही, असं देशमुख यांनी वेळोवळी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिल्यानंतर भाजपनं देशमुख यांनाही घेरलं आहे.

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर संजय निरुपम यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांनी आता हा नाहक प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. सुशांतसिंह मृत्यूचं प्रकरण सीबीआयकडे सोपवावं. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर संशय नाही. पण या प्रकरणात चालढकल केली जात होती. तसं दिसतही होतं. त्याचं कारण सरकारलाच माहीत, असंही निरुपम यांनी म्हटलं आहे.

वाचाः गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत; राजीनाम्याची मागणी

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/we-will-examine-it-and-decide-further-course-of-action-mumbai-police-commissioner-on-supreme-court-verdict/articleshow/77633283.cms