मुंबई बातम्या

Coronavirus : मुंबई सावरतेय! – Loksatta

सक्रिय रुग्णसंख्येतही घट; केवळ एका विभागात हजारापेक्षा अधिक रुग्ण

मुंबई : मुंबई महापालिकेच्या २४ पैकी तब्बल २३ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या प्रत्येकी एक हजाराच्या खाली घसरली आहे. केवळ एकाच प्रशासकीय विभागात म्हणजे बोरिवली परिसरात सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक आहे. परिणामी, गेल्या काही आठवडय़ांपासून नवीन रुग्णांची संख्या कमी होत असलेली मुंबई आता करोनातून सावरू लागल्याचे चित्र आहे.

मुंबईत मार्चमध्ये पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला आणि त्यानंतर आतापर्यंत एक लाख एक हजार ६१५ मुंबईकरांची बाधा झाली. आजघडीला पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या तुलनेत अंधेरी-पूर्व (‘के-पूर्व’) परिसरात सर्वाधिक म्हणजे ७,९९९ जणांना करोनाची बाधा झाली. मात्र येथील ६,५५४ रुग्ण बरे झाले, तर ४९५ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला या भागात ९५० सक्रिय रुग्ण आहेत. मालाड (पी-उत्तर) परिसरातील रुग्ण संख्या ७,६९७ वर पोहोचली असून ६,६३० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३३६ जणांचा मृत्यू झाला असून आजघडीला येथे ७३१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णसंख्येच्या बाबतीत त्याखालोखाल दादर, माहीम, धारावी (जी-उत्तर), अंधेरी-पश्चिम (के-पश्चिम), भांडूप (एस), बोरिवली (आर-मध्य), घाटकोपर (एन) या प्रशासकीय विभागांचा क्रमांक लागतो. या आघाडीवरील विभागांपैकी बोरिवलीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १,१७७ इतकी आहे. आतापर्यंत या विभागातील ६,६५८ जणांना करोनाची बाधा झाली असून ५,२४० रुग्ण करोनामुक्त झाले, तर २४१ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईच्या अनेक भागांत करोनाबाधितांची संख्या वाढू लागताच पालिकेने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली. काही भागांत ‘वरळी पॅटर्न’, तर काही भागांत ‘मिशन धारावी’ची अंमलबजावणी करण्यात आली. धारावीप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी, लक्षणे जाणवणाऱ्यांची करोना चाचणी करण्यास सुरुवात केली. करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचा इतर नागरिकांशी संपर्क येऊ नये याची काळजी घेण्यास सुरुवात केली. अतिजोखमीच्या गटातील संशयितांची रवानगी करोना काळजी केंद्रात, तर कमी जोखमीच्या गटातील संशयितांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले. ठिकठिकाणी तपासणी शिबीर, गल्ली शिबिरांचे आयोजन करून करोनाबाधितांचा शोध सुरू केला. मोबाइल दवाखाना, खासगी डॉक्टरांची मदत अशा अनेक उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश मिळू लागले आहे. परिणामी, २४ पैकी २३ प्रशासकीय विभागांमधील रुग्णसंख्या एक हजाराच्या खाली घसरली आहे, तर लवकरच बोरिवलीमधील रुग्णसंख्याही नियंत्रणात येईल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

विभाग     बाधित  करोनामुक्त    मृत्यू   सक्रिय

अंधेरी-पू.     ७९९९  ६५५४              ४९५    ९५०

मालाड        ७६९७   ६६३०             ३३६     ७३१

दादर          ७५४८      ६१२०           ४७२    ९५६

अंधेरी-प.     ७१२५   ५९५०             ३०७    ८६८

भांडूप          ७०२४  ५८१३             ४३६      ७७५

बोरिवली      ६६५८   ५२४०           २४१    ११७७

घाटकोपर      ६६२५   ५५५२          ३८८    ६८५

परळ             ५९८०   ४८९८         ३४०    ७४२

कांदिवली      ५९५९   ४७८५         १९७    ९७७

एल्फिन्स्टन ५५८३   ४५७४          ३८०    ६२९

कुर्ला            ५५६३   ४६४७         ४२८    ४८८

मुलुंड           ५५०३   ५४८८        १६३    ७५२

ग्रॅन्टरोड        ५३०८   ४२४४       २१३    ८५१

भायखळा      ५०३७   ४०७९      २८३    ६७५

माटुंगा          ४९६६   ४०९७      २८५    ५८४

चेंबूर-पू.        ४५०६   ३६२४       ३०५    ५७७

वांद्रे-पू.         ४४२९   ३६१६        ३४९    ४६४

गोरेगाव         ४२४२   ३३९३       २२५    ६२४

चेंबूर-प.         ३८०८  ३०५४        २८५    ४६९

वांद्रे-प.           ३४८९   २७७७        १८०    ५३२

दहिसर           ३२६१   २५७८        १४१    ५४२

कुलाबा           ३११३   २५२८        ६८     ५१७

मरिन ड्रा.       १७८२   १४३४         ९६     २५२

सॅण्डहर्स्ट        ११६३  ८४०          ८५     २३८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 18, 2020 12:45 am

Web Title: coronavirus active cases decreasing in mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-active-cases-decreasing-in-mumbai-zws-70-2248538/