मुंबई बातम्या

लॉकडाऊनमध्ये दम मारो दम; जोगेश्वरीतील हॉटेल बॉम्बे ब्रूटवर कारवाई – Saamana

लॉकडाऊन असतानाही स्पेशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी करत पहाटेपर्यंत ‘दम मारो दम’ पार्टी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. ओशिवरा पोलिसांनी आज पहाटे जोगेश्वरी येथील बॉम्बे ब्रूट नावाच्या हॉटेलमध्ये कारवाई करून 97 जणांना ताब्यात घेतले. हॉटेलचा मॅनेजर, वेटर सह 69 जणांना पोलिसांनी अटक केली. तर 28 महिलांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते.

जोगेश्वरी लिंक रोड परिसरात बॉम्बे ब्रूट नावाचे हॉटेल आहे. त्या हॉटेल मध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर ओशिवरा पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी गेले. तेव्हा काही पुरुष आणि महिला या दारू पिऊन डान्स करत होत्या तर काहीजण हुक्का पित बसले होते.

दोन दिवसांपासून हॉटेल सुरू केले गेले होते. हॉटेलच्या मॅनेजरने त्या सर्वांना बोलवले होते अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. त्या सर्वांविरोधात भारतीय दंड विधान कलम आणि साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Source: https://www.saamana.com/jogeshwari-hotel-bombay-brute-police-raid/