मुंबई बातम्या

मुंबई – मांडवा रो-रोला अखेर मुहूर्त सापडला; या दिवशी सेवा सुरू हाेणार – Sakal

अलिबाग : बहुप्रतीक्षीत मुंबई ते मांडवा या सागरी मार्गावरील रो-रो सेवा सुरु होण्यास मुहुर्त अखेर सापडला. या सेवेमुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनमधील चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. 

15 मार्चला ही सेवा घाईघाईत सुरु करण्यात आली. मात्र, कोरोना संकट गडद झाल्यामुळे दुसऱ्याच दिवशी ती बंद करावी लागली होती. आता गौरी-गणपतीच्या सणासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी शुक्रवार (ता. 20) पासून सुरु होणार आहे. सकाळी 9.15 वाजता व्यावसायिक तत्त्वावर प्रवाशांची पहिली बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून मांडवा बंदराकडे निघणार आहे. हिच बोट सायंकाळी 4 वाजता मांडवा येथून परतीचा प्रवास करेल. हे वेळापत्रक 30 ऑगस्टपर्यत कायम राहणार असून त्यानंतर प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन बदल केला जाणार असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे. यासाठीचे ऑनलाईन बुकिंग सुरु झाले आहे. 

हे वाचा : पनवेल स्टेशनवर जन्मले बाळ

मुंबई-मांडवा या 19 किलोमीटरच्या सागरी मार्गावर रो-रो सेवा देण्याचा करार बंदर विभागाने एमएम कंपनीशी केला आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या मांडवा येथील जेट्टीचे काम दोन वर्षापुर्वीच पुर्ण झाले होते. सागरमाला प्रकल्पांतर्गत मांडवा येथे बांधण्यात आलेल्या ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह जेट्टीसाठी तब्बल 135 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे निकष लक्षात घेऊन मांडवा येथे अद्यावत वाहनतळ, प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष तयात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रायगडच्या पर्यटनाला पूरक अशा माहिती फलकाने अंतर्गत सजावट विश्रांती कक्षाची करण्यात आलेली आहे. 

धक्कादायक : मुंबईवर आणखी एक संकट

गणेशोत्सवामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत असते. मुंबईतून बाहेर निघतानाच तासनतास वाहतूक कोंडीमध्ये चाकरमान्यांना प्रवास टाळता येणार आहे. या रो-रो बोटीतून मुंबईतील चाकरमान्यांना स्वतःचे वाहन घेऊन रायगडमध्ये येता येणार आहे. ही सेवा गौरी-गणपतीच्या सणासाठी सुरु करावी, अशी मागणी येथील प्रवाशी, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक करीत होते. 

सेवेचे वैशिष्ट्य 
* मुंबई ते अलिबागपर्यंतचा प्रवास तीन तासाचा प्रवास होणार एका तासात 
* ग्रीस बनावटीची उपहारगृह, प्रवासी कक्ष, प्रथोमचार, पार्किंग सुविधा असणारी अद्यावत फेरी बोट 
* स्वतःच्या वाहनाने लुटता येणार पर्यटनाचा आनंद 
 
असे आहेत तिकट दर (रुपयांत) 
प्रवासी – 300 
पाळीव प्राणी- 300 
लहान कार-800 
मध्यम आकाराची कार 1000 
मोठे चारचाकी प्रवासी वाहन- 1200 
दुचाकी -200 
सायकल – 100 

रोरोमध्ये सोशल डिस्टंन्सिग पाळणे शक्‍य होणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीने युक्त असलेल्या फेरीबोटीमधून सागरी पर्यटनाचा मनमुराद आनंद प्रवाशांना लुटता येणार आहे. प्रवासासाठी एम2एम फेरी सर्व्हिसेसच्या अधिकृत वेबसाईटवरुन बुकींग सुरु झाली आहे. 
-हाशिम मोंगिया, संचालक, रो-रो सव्हिसेस (एम 2 एम फेरीबोट) 

– संपादन : नीलेश पाटील

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-mandwa-roro-start-it-will-save-time-and-money-334426