मुंबई बातम्या

मुंबईतील तलावांत पाणीसाठा ७५ टक्के – Loksatta

गणपतीपूर्वी पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला असून लवकरच पाणी कपात रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र येत्या पाच सहा दिवसात किती पाऊस पडतो त्यावर आढावा घेऊन ही कपात रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सातही तलावात मिळून सुमारे ११ लाख दशलक्षलीटर पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईत पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात मात्र पाऊस पडत आहे. त्यामुळे तलावातील पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होते आहे. दररोज ४ ते ५ टक्के पाणीसाठा वाढत असल्यामुळे रविवापर्यंत ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही तलावात मिळून १० लाख ९९ हजार ४४५ दशलक्षलीटर पाणीसाठा जमा झाला आहे.

तलावातील पाणीसाठा ४ ऑगस्टला ३४ टक्कय़ांपर्यंत खालावल्यामुळे ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. गेले दहा दिवस मुंबईत ही पाणी कपात सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. मात्र पाणी कपात गेल्यानंतर गेल्या दहा बारा दिवसात पावसाने तलावक्षेत्रात दमदार हजेरी लावल्यामुळे पाणी टंचाईचे हे संकट दूर होण्याची चिन्हे आहेत. त्यातच गणेशोत्सवाला अवघे पाच सहा दिवस उरलेले असताना पाणी कपात रद्द करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे ही त्यापूर्वी म्हणजे येत्या एक दोन दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तुळशी आणि विहार हे दोन तलाव आतापर्यंत पूर्ण भरले आहेत.

साडेतीन दशलक्ष लीटरची तूट

मुंबईला दररोज ३८०० दशलक्षलीटर पाणी पुरवठा करावा लागतो. पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असणे आवश्यक आहे. सातही तलावात मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्षलीटर इतका पाणीसाठा जमा होणे आवश्यक असते. अद्याप साडे तीन लाख दशलक्षलीटरची तूट असून पावसाळ्याचा दीड महिना शिल्लक आहे.

तलाव             पाणीसाठा          टक्केवारी

(दशलक्षलीटरमध्ये)

उर्ध्व वैतरणा    १,३५,०७७         ५९.४९ टक्के

मोडक सागर    १,१६,८३१       ९०.६२ टक्के

तानसा            १,१४,९१३         ७९.२१ टक्के

मध्य वैतरणा    १,५९,९१४       ८२.६३ टक्के

भातसा            ५,३६,९६६       ७४.८९ टक्के

विहार              २७,६९८          १०० टक्के

तुळशी             ८,०४६           १०० टक्के

वर्ष            पाणीसाठा              टक्केवारी

२०२०   १०,९९,४४५ दशलक्षलीटर   ७५.९६

२०१९   १३,५६,०१२ दशलक्षलीटर   ९३.६९

२०१८   १२,९९,६५८ दशलक्षलीटर   ८९.७९

पाणीसाठा किती जमा झाला आहे, त्याचा आढावा घेऊ आणि गणपतीपूर्वी पाणी कपातीबाबत निर्णय घेऊ.

इक्बाल सिंग चहल, पालिका आयुक्ता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 17, 2020 3:21 am

Web Title: 75 percent of water storage in mumbai lakes zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/75-percent-of-water-storage-in-mumbai-lakes-zws-70-2247658/