म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या परिसरातील रेस्तराँ महापालिकेने पाडले असून, त्या कारवाईला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर करण्यात आली.
रेस्तराँचे मालक पी. रामचंद्रन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा हायकोर्टाने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांना नोटीस बजावली तसेच तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.
याचिकाकर्त्यानुसार, विदर्भ साहित्य संमेलनाच्या परिसरातील जागा १,९६३ मध्ये भाडेपट्टीवर घेतली होती तसेच तिथे आनंद भवन नावाचे रेस्तराँ सुरू केले. परंतु, तिथे अनधिकृत बांधकाम करण्यात आले, असा दावा महापालिकेने केला. तसेच कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असल्याने अतिक्रमण विभागाच्या पथकाने ७ ऑगस्ट रोजी तेथील बांधकाम पाडले. मनपाने केलेली कारवाई अवैध असल्याचा दावा याचिकेत केला आहे. दिवाणी न्यायालयाने रेस्तराँवर कारवाई करण्यास मनाई केली होती तसेच करोना काळात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. दोन्ही न्यायालयांच्या आदेशांची अवहेलना मनपाने केली आहे, असा आरोप याचिकेत केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी बाजू मांडली.
Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/restaurant-owner-has-challenged-restaurant-demolition-action/articleshow/77551208.cms