मुंबई बातम्या

…मुंबई विमानतळावर इंडिगोला स्लॉट नाही – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबईसाठी १५ ऑगस्टपासून औरंगाबादमधून आठवड्यातून तीन दिवस विमान सुरू करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. मात्र, मुंबई विमानतळावर अजूनही इंडिगोला सकाळचा स्लॉट मिळाला नाही. त्यामुळे हे विमान सुरू होण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाली आहे.

औरंगाबाद विमानतळावरून आगामी १९ ऑगस्टपासून हैदराबादसाठी नियमित विमान सुरू केले जाणार आहे. ‘एटीआर’ विमानातून औरंगाबादकरांना दररोज हैदराबादला जाण्यासाठी विमान सेवा उपलब्ध होणार आहे. इंडिगो कंपनीने हैदराबादसह औरंगाबाद मुंबई अशी विमान सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस औरंगाबाद ते मुंबई विमान चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळच्या सत्रात हे विमान चालविण्यात येणार आहे. पूर्वी जेट एअरवेजच्या वेळापत्रकाप्रमाणे औरंगाबाद मुंबई असे वेळापत्रक नियोजित करण्यात आले होते. मात्र, इंडिगो कंपनीने मागीतलेल्या स्लॉट संबंधित विभागाकडून अजूनही देण्यात आलेला नाही. सध्या मुंबईहून जाणाऱ्या विमानांची संख्याही घटलेली आहे. पूर्वी दररोज हजाराच्या वर विमानांची वाहतूक मुंबई विमानतळावर होत होती. सध्या ही संख्या २०० ते २५०च्या दरम्यान असल्याची माहिती विमान कंपनीच्या सदस्यांकडून दिली जात आहे. विमानांची संख्या घटल्याने औरंगाबाद मुंबई या मार्गावर विमान चालविण्यासाठी लवकर स्लॉट मिळेल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली. स्लॉट उपलब्ध नसल्याने, औरंगाबाद ते मुंबई असे कनेक्शन पुन्हा सुरू होण्यासाठी उशीर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईपेक्षा हैदराबाद फास्ट

दरम्यान हैदराबाद ते औरंगाबाद हे विमान आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येत होते. सदर विमान नियमित करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने हैदराबादच्या विमानतळाला कळविल्यानंतर त्यांनी इंडिगोला दररोजसाठी स्लॉटही उपलब्ध करून दिला आहे. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानासोबत देशभरातील महत्वाच्या शहरातून विमाने येत असल्याने त्यांनी अजूनही औरंगाबाद विमानासाठी स्लॉट उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/indigo-does-not-have-a-slot-at-mumbai-airport/articleshow/77525834.cms