मुंबई बातम्या

सुशांतसिंह राजपूत प्रकरण : मुंबई पोलीस योग्य पद्धतीने काम करत आहेत – देशमुख । Sushant SinghRajput case : Mumbai Police is investigating the case very professionally: Home Minister Anil Deshmukh – Zee २४ तास

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात (Sushant Singh Rajput case ) पुढील दिशा काय असेल, यावर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) योग्य पद्धतीने काम करत आहेत असा दाखला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी दिला आहे. मुंबई पोलीस हे चांगले व्यावसायिक (very professionally) आहेत. त्यामुळे ते योग्य प्रकारे तपास करत आहेत, असे देशमुख यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.  

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस चांगल्या पद्धतीने तपास करत आहेत, असे देशमुख म्हणालेत. दरम्यान, सुशांत याच्या वडिलांनी पाटणा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरु केला. तर दुसरीकडे हा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी झाली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. केंद्राने हा तपास सीबीआयकडे देण्याबाबत अनुकुलता दर्शविली. त्यामुळे आता सीबीआय सुशांत प्रकरणी तपास कणार आहेत. 

सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असून ते तपासात हलगर्जीपणा करत आहेत,असा आरोप विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचंही भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. तर आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधक राजकारण करत आहेत, असे म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली असली तरी राज्य सरकारने अद्याप हा तपास सीबीआयकडे सोपवलेला नाही. त्यामुळे तपास कोण करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारची या प्रकरणात पुढील भूमिका काय आहे, असे देशमुख यांना विचारले. त्यावर मुंबई पोलीस योग्य पद्धतीने काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. सुशांत प्रकरणात ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते त्या आधारावर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/sushant-singhrajput-case-mumbai-police-is-investigating-the-case-very-professionally-home-minister-anil-deshmukh/530176