मुंबई बातम्या

Rains LIVE UPDATE | जे जे रुग्णालयात साचलेल्या पाण्याचा निचरा, मुंबई महापालिकेची माहिती – ABP Majha

मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रेल्वे रुळावर पाणी आल्याने लोकलही अडकल्या होत्या. एनडीआरएफ जवानही मदतकार्यात गुंतले आहे. शिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने येत्या 24 तासास मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरु आहे.

तर कोल्हापुरातही जोरदार पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्र सोडलं आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीशेजारच्या गावातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे. कोल्हापुरात धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.

Source: https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-rains-forecast-and-alert-live-updates-heavy-rains-inundate-parts-of-thane-palghar-kolhapur-red-alert-issued-in-mmr-796559