मुंबई बातम्या

मुंबईत २० टक्के पाणीकपात – Times Now Marathi

मुंबईत २० टक्के पाणीकपात& 

थोडं पण कामाचं

  • मुंबईत २० टक्के पाणीकपात
  • शुक्रवारच्या बैठकीत ‘पाणीबाणी’वर चर्चा
  • मोठ्या तलावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

मुंबई: मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा आहे. तलावांच्या भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे मुंबई मनपाच्या (Municipal Corporation of Greater Mumbai – MCGM) हद्दीत दररोज २० टक्के पाणीकपात (Mumbai will face 20 percent water cut) करण्याची तयारी झाली आहे. ही पाणीकपात १ ऑगस्टपासून (शनिवार) लागू होणार आहे. पाऊस पडला आणि पाणीसाठा वाढला तर टप्प्याटप्प्याने ही पाणीकपात कमी केली जाणार आहे. मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी ही माहिती दिली. 

शुक्रवारच्या बैठकीत ‘पाणीबाणी’वर चर्चा

पालिका नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एक बैठक होणार आहे. या बैठकीत पाणीकपातीवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्तांनी दिले. मुंबईत पाऊस व्यवस्थित सुरू आहे. मात्र तलावांच्या भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस अद्याप झालेला नाही, असे आयुक्त म्हणाले. वेधशाळेने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या कालावधीत तलावांच्या भागात अपेक्षित पाऊस झाला तर पाणीकपात कमी अथवा रद्द करण्याचा विचार करता येईल. मात्र सध्याच्या परिस्थितीत खबरदारी म्हणून पाणीकपात आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले. मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मोठ्या तलावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा, मोडकसागर या तीन मोठ्या तलावांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. याच कारणामुळे पाणीबचत करणे आवश्यक आहे. पाणीकपात करुन शिल्लक पाणीसाठ्याचा दीर्घकाळ वापर करण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मुंबई मनपाचे आयुक्त चहल म्हणाले. पाऊस पडून तलावांतील पाणीसाठा वाढावा, हीच आमची इच्छा आहे. पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होईपर्यंत पाणीकपात करुन पाणी वाचवणे हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

मुंबईसाठी मर्यादीत पाणीसाठा उपलब्ध

मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये किमान १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. तलावांमध्ये सध्या ४ लाख ९३ हजार ६७५ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या सुमारास तलावांमध्ये ११ लाख ९४ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. याआधी २०१४, २०१५ मध्ये मुंबईत ऐन पावसाळ्यात पाणीकपात करावी लागली होती. तसेच नोव्हेंबर २०१८ पासून जुलै २०१९ पर्यंत पाणीकपात करण्यात आली होती. मुंबईला २००९ मध्ये वर्षभर पाणीकपातीचा सामना करावा लागला.

बातमीची भावकी

तलावातील पाणीसाठा

  1. भातसा तलाव bhatsa lake – २,७३,६४५ दशलक्ष लिटर (७,१७,३०७ दशलक्ष लिटर क्षमता)
  2. तानसा तलाव tansa lake – ३६,९५९ दशलक्ष लिटर (१,४५,०८० दशलक्ष लिटर क्षमता)
  3. मोडकसागर तलाव modak sagar lake – ५१,५७३ दशलक्ष लिटर (१,२८,९२५ दशलक्ष लिटर क्षमता)
  4. अप्पर वैतरणा तलाव upper vaitarna lake – २७,०४७ दशलक्ष लिटर (३९,३७५ दशलक्ष लिटर क्षमता) 
  5. विहार तलाव vihar lake – १८,५५१ दशलक्ष लिटर (२७,६९८ दशलक्ष लिटर क्षमता)
  6. तुळशी तलाव tulsi lake – ८,०४६ दशलक्ष लिटर (८,०४६ दशलक्ष लिटर क्षमता)

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-will-face-20-percent-water-cut/305604