मुंबई बातम्या

मुंबई लोकल कधी सुरु होणार? राजेश टोपे म्हणतात… – Loksatta

लॉकडाउनमुळे बंद असलेली मुंबईची लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल बोलताना लोकल सुरु करण्याची मागणी रास्त आहे, मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं सांगितलं. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यायामशाळा आणि मॉल सुरू करण्याची मागणी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे. सर्वबाजूंनी विचार करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा असून कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एसटी बसनेच प्रवास करावा लागत आहेत. दरम्यान नालासोपारा येथे बुधवारी एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला आणि त्यांनी लोकलने प्रवास करु देण्याची मुभा दिली जावी अशी मागणी केली. यावर बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, “लोकल सेवा सुरु कऱण्याची मागणी रास्त आहे. पण लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन शक्य नाही. सध्या हे धोक्याचं ठरु शकतं. लोकल ट्रेन सुरु करण्यासंबंधी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील”.

“शिथिलीकरणाच्या टप्प्यात पुन्हा टाळेबंदी होऊ नये असाच प्रयत्न आहे. जास्तीत जास्त गोष्टी कशा सुरू होतील यासाठी नियम-निकष ठरवण्याचा सरकारचा विचार आहे. आरोग्याशी संबंधित असल्याने व्यायामशाळा सुरू कराव्यात, सर्व अटी पाळून मॉलमधील दुकानांनाही परवानगी द्यावी अशी मागणी होत असून सरकार त्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. सर्वबाजूंनी विचार करून त्याबाबत निर्णय होईल. या गोष्टी सुरू करायच्या झाल्यास त्याबाबत नियम-अटी काय असाव्यात हे ठरवले जाईल,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. सर्वात शेवटी धार्मिक, राजकीय तसंच सार्वजनिक कार्यक्रम यांना शिथीलता दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on July 23, 2020 11:11 am

Web Title: coronavirus maharashtra health minister rajesh tope on mumbai local sgy 87

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-maharashtra-health-minister-rajesh-tope-on-mumbai-local-sgy-87-2224977/