मुंबई बातम्या

रिकव्हरी रेटमध्ये ‘मुंबई’ अव्वल; देशासह राज्यालाही टाकले मागे… – Sakal

मुंबई : दिवसेंदिवस राज्यासह मुंबईत देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे, मुंबईने देशासह राज्यालाही मागे टाकले आहे. 

मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे एक हजार २२८ नवे रुग्ण आढळले असून ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ९८ हजारांच्या पुढे गेली आहे. तर, मृतांचा आकडा पाच हजार ५८२ वर गेला आहे. मात्र, मुंबईतील ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हा दर देशाच्या आणि राज्याच्या सरासरी दरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, रिकव्हरी रेटमध्ये ‘मुंबई’ अव्वल ठरली आहे. तर, दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर मुंबईपेक्षा जास्त आहे.

मुंबईतील बाधितांची संख्या ९८ हजार पार… 

मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ९८ हजार ९७९ झाली आहे. तर, दुसरीकडे या कोरोनावर आतापर्यंत ६९ हजार ४३० जणांनी मात केली आहे. त्यामुळे , मुंबईचा रिकव्हरी रेट हा ७० टक्के झाला आहे. तर, महाराष्ट्राचा कोरोनामुक्तीचा दर ५५ टक्के असून देशाचा रिकव्हरी रेट ५२ टक्के आहे. त्यामुळे, महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेत मुंबईचा रिकव्हरी रेट खूप जास्त आहे. या गोष्टीची दखल केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने घेतली असून तसे प्रसिद्धीपत्रकही काढले आहे. कोरोनामुक्त रुग्णांचा दर वाढला की उपचाराधीन (सक्रिय) रुग्णांची संख्या कमी होत जाते आणि ही अतिशय आशादायक गोष्ट असल्याचे यात म्हटले आहे.

असा वाढला रिकव्हरी रेट… 

जूनच्या मध्यापर्यंत मुंबईतील ५० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर, पालिकेने ‘मिशन झिरो’ ही मोहीम हाती घेतली आणि रुग्णसंख्या कमी करण्यावर भर दिला. त्यानंतर १ जुलैला ५७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५ जुलैपर्यंत ७० टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, दिल्लीतील कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी मुंबईपेक्षा अधिक चांगली आहे. दिल्लीत १ लाख १८ हजार एकूण बाधित रुग्ण असून येथील ८२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संपादन- सुस्मिता वडतिले 

Source: https://www.esakal.com/mumbai/recovery-rate-corona-patients-mumbai-has-reached-70-cent-322957