मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट आणि कलिना कँपसमध्ये कोरोना – Times Now Marathi

मुंबई विद्यापीठ& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट आणि कलिना कँपसमध्ये कोरोना
  • कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत आणि विमा संरक्षण देण्याची मागणी
  • दोन्ही कँपसमध्ये ये-जा करणाऱ्यांच्या कोरोना चाचणीची मागणी

मुंबईः मुंबई विद्यापीठाच्या (mumbai university) फोर्ट (University of Mumbai Fort Campus) आणि कलिना (Kalina Campus University of Mumbai) येथील कँपसमध्ये कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळले (corona cases in mumbai university) आहेत. विद्यापीठाच्या कलिना कँपसमधील परीक्षा व मूल्यमापन विभागातील वरिष्ठ लिपिक, शिपाई तसेच फोर्टच्या कँपसमधील विधी विभागातील वरिष्ठ लघु लेखिका, हवालदार, लेखापाल, ग्रंथालय शिपाई, कनिष्ठ लिपिक कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत आणि विमा संरक्षण देण्याची मागणी

कोरोना झालेल्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ६० ते ७० जणांना तातडीने घरातच होम क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आणखी कोणी आले होते का ते तपासले जात आहे. विद्यापीठातील ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे त्यांचा पगार मर्यादीत आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी  विद्यापीठातील इतर कर्मचारी करत आहेत. विद्यापीठाच्या सर्व कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे हंगामी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही विशेष परिस्थिती म्हणून विद्यापीठाकडून आरोग्य विम्याचे संरक्षण देण्याची मागणी कर्मचारी करत आहेत. 

दोन्ही कँपसमध्ये ये-जा करणाऱ्यांच्या कोरोना चाचणीची मागणी

कोरोना संकटामुळे विद्यापीठातील वर्दळ एकदम कमी झाली आहे. मात्र कामकाजाच्या निमित्ताने फोर्ट आणि कलिना कँपस या दोन्ही ठिकाणी ये-जा करणारे काही कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना चाचणी करण्याची मागणी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. शक्य तितक्या लवकरच विद्यापीठात काम करणाऱ्या सर्वांचीच खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करावी अशीही मागणी पुढे येत आहे. सध्या विद्यापीठाच्या  ज्या विभागांमध्ये कोरोना रुग्ण आढळले त्या विभागांना तात्पुरते बंद करुन तिथे निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. हे काम झाल्यावर विभागांचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. 

विद्यापीठात खबरदारी घेऊनही पसरला कोरोना

सरकारी आदेशानुसार दररोज मुंबई विद्यापीठात १० ते १५ टक्के कर्मचारी उपस्थित राहून दैनंदिन काम करत आहेत. निकालांच्या नियोजनाचा ताण असताना विद्यापीठात कोरोना पसरला. विद्यापीठाच्या आवारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना कोरोना झाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आवश्यक ती खबरदारी घेतली जाते तरी कोरोना पसरला. नकळत चूक झाल्यामुळे, खबरदारी घेण्यात हयगय झाल्याने कोरोना पसरल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनाचा आणखी प्रार्दुभाव होण्याचा धोका लक्षात घेऊन कर्मचारी संघटनेने विद्यापीठातील सर्व कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे हंगामी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आरोग्य विम्याचे संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

बातमीची भावकी

मुंबई मनपाच्या हद्दीत २२ हजार ७७३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई मनपाच्या हद्दीत आतापर्यंत ९५ हजार १०० कोरोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी २२ हजार ७७३ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधीत आढळलेल्यांपैकी ६६ हजार ६३३ जण बरे झाले आहेत तर ५ हजार ४०५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई मनपाच्या हद्दीत कोरोना झालेल्यांपैकी २८९ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे. 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/corona-cases-in-mumbai-university/302940