मुंबई बातम्या

करोनामुक्तांच्या संख्येत मुंबई आघाडीवर – Loksatta

राज्यातील करोनाचा कहर अजून थांबत नसला तरी, बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखाच्या जवळ पोहचली असून, संबंध  देशाला चिंता लागलेली मुंबईही त्यात आघाडीवर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्यांवर पोहचले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात एका बाजूला करोनाचे रुग्ण वाढत असले तरी, उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होऊन घरी जाण्याची संख्या त्याहून अधिक आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ४० हजार ३२५ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवापर्यंतची ही माहिती आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत मुंबईने मोठा पल्ला गाठला आहे. मुंबई बाधित रुग्णांची  संख्या ९२ हजार ९८८ होती, त्यांतील ६४ हजार ८७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २२ हजार ५०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्य़ात बाधित रुग्णांची  ६१ हजार ८६९, बरे झालेले रुग्ण २६ हजार ४८९ आणि प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३३ हजार ७३३ आहे.

मुंबई, ठाण्याखोलाखाल पुणे जिल्ह्य़ात करोनाचा कहर झाला आहे. रविवार्पयच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्य़ात बाधित रुग्णांची संख्या ३९ हजार १२५ होती, त्यातील १६ हजार ४२७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  सध्या २१ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील इतर जिल्ह्य़ांतही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात आले.

ठाणे जिल्ह्यात नवे १ हजार ७०० रुग्ण

जिल्ह्य़ात सोमवारी १ हजार ७०० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा ५७ हजार ४ इतका झाला आहे. तर, सोमवारी जिल्ह्यात ३५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकुण मृत्यू  झालेल्यांची संख्या १ हजार ६५१ वर पोहचली आहे. ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी १ हजार ७०० नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ४२७, ठाणे शहरातील ३३३, नवी मुंबईतील २३३, उल्हासनगर २२५, मीरा-भाईंदरमधील १७८, ठाणे ग्रामीणमधील १२७, बदलापूरातील ८४, अंबरनाथमधील ५१ आणि भिवंडीतील ४२ रुग्णांचा समावेश आहे. तर, सोमवारी जिल्ह्य़ात ३५ करोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीमधील ९, मीरा-भाईंदरमधील ८, ठाण्यातील ७, ठाणे ग्रामीणमधील ४, उल्हासनगरमधील ४, नवी मुंबईतील २ आणि भिवंडीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on July 14, 2020 12:36 am

Web Title: mumbai leads in number of corona free abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-leads-in-number-of-corona-free-abn-97-2215459/