मुंबई बातम्या

मुंबईत हाय टाईडचा इशारा; या वेळेत समुद्रकिनारी जाणं टाळा | high-tide-warns-in-mumbai-sea-waves-to-rise-4-7-meters-today – Zee २४ तास

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने रविवारी मुंबईत Mumbai Rain हाय टाईडचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी भरतीची शक्यता असून 4.7 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचाही अंदाज वर्तवला आहे. 

मुंबईत सकाळपासूनच पाऊस सुरु आहे. एकीकडे मान्सून शहरात आणि राज्यात स्थिरावत असतानात दुसरीकडे मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही सखल भागांत पाणी साचत असल्याचं चित्र आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. पुढील चार दिवस मुंबई आणि आसपासच्या भागांना हवामान विभागाने सावधानतेचा, सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईतील सायन, हिंदमाता आणि इतर अनेक सखल भागात पाणी भरत असल्याने, या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी महापालिकेकडून तयारी करण्यात आली आहे. पालिकेकडून सखल भागात पंपिंग मशीन लावण्यात आल्या असून पाणी काढण्याचं काम सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत कुलाबा येथे 129.6 मिमी आणि सांताक्रुझ येथे 200.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. 

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा आकडा पार केला असून त्यापैकी एकट्या मुंबईत कोरोना रुग्ण संख्या 80 हजांवर गेली आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करताना आता नागरिकांना पावसाच्या दिवसांतही सतर्क राहावे लागणार आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघर, कोकण भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/high-tide-warns-in-mumbai-sea-waves-to-rise-4-7-meters-today/526252