मुंबई बातम्या

नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय… – Sakal

नागपूर : रेल्वेच्या ट्रॅकवर खासगी ट्रेन चालविण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. खासगी प्रवासी रेल्वे चालविल्या जातील त्या मार्गांमध्ये मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत असणाऱ्या नागपूर-मुंबई आणि अकोला-मुंबई या मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे अकोला आणि नागपूरकर प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी किंवा परतण्यासाठी आखणी एक सुविधाजणक पर्याय उपलब्ध होणार आहे.

नागपूर-मुंबई हा व्यस्ततम रेल्वेमार्गांपैकी एक आहे. या मार्गावरील रेल्वेगाड्यांमध्ये नियमित गर्दी असते. यामुळे नागपूर-मुंबई व अकोला-मुंबई दरम्यान खासगी रेल्वे चालविण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावानुसार नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान दोन खासगी रेल्वेगाड्या धावतील. त्यातील एक गाडी आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. तर दुसरी गाडी दर बुधवारी मुंबईहून रवाना होऊन 10.20 तासात त्याच दिवशी नागपुरात येईल. हीच गाडी गुरुवारी नागपूरहून परतीच्या प्रवासाला निघेल आणि 10.35 तासात शुक्रवारी सकाळी मुंबईला पोहोचेल. या दोन्ही गाड्या आठवड्यात केवळ एक दिवस धावणार आहे.

अधिक माहितीसाठी – माहेराच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी, पहिली आषाढीही सासरीच…

याचप्रमाणे अकोला-मुंबई-अकोला रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावेल. ही रेल्वे मुंबईहून मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी रवाना होऊन 14.30 तासात अकोल्यात येईल. तर अकोला येथून बुधवार, शनिवार आणि सोमवारी परतीच्या प्रवासाला निघेल आणि 13.50 तासात मुंबई गाठेल.

भारतीय रेल्वेने खासगी ट्रेन चालविण्याच्या दिशेने आवश्‍यक प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. अंतिम मुदत आठ सप्टेंबर आहे. प्रस्ताव आल्यानंतर 60 दिवसांमध्ये इच्छुक कंपन्यांची यादी तयार केली जाईल. बोलीसाठी (आरएफक्‍य) मागविले जाईल. या प्रक्रियेनंतर सर्वाधिक दर देणाऱ्या कंपन्यांना ट्रेन चालविण्याची परवानगी मिळणार आहे.

हेही वाचा – अफलातून..! एमबीबीएस एम.डी. डॉक्‍टर निघाला केवळ बारावी पास

भारतीय रेल्वेची 12 क्‍लस्टरमध्ये विभागणी

देशभरातील प्रमुख मार्गांवर 224 खासगी रेल्वे चालविण्यात येतील. मार्गांनुसार भारतीय रेल्वेची 12 क्‍लस्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यात मुंबई मार्ग क्‍लस्टर-1मध्ये समाविष्ट आहे. या मार्गावर 16 खासगी रेल्वे चालविण्यात येणार आहे. सर्व 224 रेल्वे चालविण्यासाठी 2,330 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

Source: https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/private-train-option-travel-nagpur-mumbai-317373