मुंबई: क्वारंटाइन सेंटरच्या नाश्त्यात अळ्या&
थोडं पण कामाचं
- मुंबई: क्वारंटाइन सेंटरच्या नाश्त्यात अळ्या
- क्वारंटाइन सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न
- रात्री ११ नंतर मिळते रात्रीचे जेवण
मुंबईः महाराष्ट्रात कोरोना संकटाची तीव्रता वाढत असताना आणखी एक चिंताजनक प्रकार घडला. राजधानी मुंबईतील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये (institutional quarantine centre) नाश्त्यात अळ्या (larvae) सापडल्या.
क्वारंटाइन सेंटरच्या खिचडीत अळ्या
मुंबईच्या पश्चिम उपनगरात हा प्रकार घडला. गोरेगाव पूर्व येथे आरे कॉलनी परिसरातील रॉयल पाम हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष (institutional quarantine centre) सुरू करण्यात आला आहे. या क्वारंटाइन सेंटरमध्ये ४५० नागरिकांना नाश्ता म्हणून साबुदाणा खिचडीचे बॉक्स देण्यात आले. यातील एका बॉक्समध्ये खिचडीत अळ्या आढळल्या. हा प्रकार लक्षात येताच संबंधित खिचडीचा बॉक्स बदण्यात आला. भाजपच्या गोरेगावच्या नगरसेविका प्रिती साटम (वॉर्ड क्रमांक ५२) यांनी हा प्रकार उघड केला. याच क्वारंटाइन सेंटरमध्ये २२ मे रोजी जेवणात अळ्या सापडल्या होत्या.
क्वारंटाइन सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न
क्वारंटाइन सेंटरमध्ये नागरिकांना कमी प्रमाणात जेवणे दिले जाते. सध्या या क्वारंटाइन सेंटरमध्ये मोठ्या संख्येने मुलं आणि महिला आहेत. अन्नाचा निकृष्ट दर्जा, अन्नात अळ्या सापडणे, कमी प्रमाणात अन्न दिले जाणे या प्रकारामुळे क्वारंटाइनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने उपाय करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.
एकाच क्वारंटाइन सेंटरमधून अन्नाविषयी दुसऱ्यांदा आली तक्रार
जेवणात अळ्या सापडल्यावर जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. हा प्रकार घडूनही नाश्त्यात अळ्या सापडल्या आहेत. कंत्राटदाराच्या या हलगर्जीपणा प्रकरणी कठोर कारवाईची मागणी क्वारंटाइनमधील नागरिक करत आहेत. मुंबई मनपाच्या अखत्यारित असलेल्या या क्वारंटाइन सेंटरमधील निष्काळजीपणासाठी तातडीने कारवाईची मागणी नगरसेविका प्रिती साटम (Corporator Priti Satam) यांनी केली आहे.
राज्यातील अनेक क्वारंटाइन सेंटरमधील अन्नाविषयी तक्रारी
महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी क्वारंटाइन सेंटरच्या अन्नात अळ्या सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. अन्नाचा दर्जा निकृष्ट असतो, कंत्राटदाराच्या मर्जीने वाटेल त्या वेळी जेवण दिले जाते; अशा स्वरुपाच्या तक्रारी राज्यातील काही क्वारंटाइन सेंटरमधून आल्या आहेत.
बातमीची भावकी
रात्री ११ नंतर मिळते रात्रीचे जेवण
पुण्याजवळच्या मोशीतील क्वारंटाइन सेंटरमधील नागरिकांनी जून महिन्यात दुपारचे जेवण दुपारी साडेतीन नंतर आणि रात्रीचे जेवण रात्री ११ नंतर मिळत असल्याची तक्रार केली होती.
क्वारंटाइनमध्ये छेडछाडीची घटना
मालाड येथील जनकल्याण नगरच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जून महिन्यात एका तरुणीची छेड काढण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/larvae-found-in-mumbai-institutional-quarantine-centre/301410