मुंबई बातम्या

Mumbai Hockey Association withdraw their associate membership and recognise Hockey Maharashtra as the state – sakalsports.com

मुंबई : केंद्रीय क्रीडा खात्याने क्रीडा संघटनांसाठी तयार केलेल्या आचारसंहितेत, एक राज्य एक संघटना, या नियमाचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. हॉकी इंडियाने एक जुलैपासून या नियमाचे कसोशीने पालन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जवळपास 80 वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र अस्तित्त्व असलेल्या मुंबई हॉकीची ओळख संपुष्टात येणार आहे. विदर्भने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली आहे; पण मुंबई हॉकी संघटनेने निर्णय मान्य केला आहे. “”निर्णयास आव्हान दिले, तर हॉकी महाराष्ट्रची संलग्नताही रद्द होईल. आम्ही आता हॉकी महाराष्ट्रास संलग्न झालो आहोत, पण विदर्भबाबत काय निर्णय होतो, याकडे आमचे लक्ष्य आहे,” असे मुंबई संघटनेचे सचिव रामसिंग राठोड यांनी सांगितले. 

क्रिकेट कर्णधारासाठी श्रीलंकेत निदर्शने ; वाचा कोणासाठी केली चाहत्यांनी गर्दी 

मुंबईचे आता स्वतंत्र अस्तित्त्व नसल्यामुळे तेथील हॉकीपटूंचे राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे, पर्यायाने राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे पर्याय कमी होतील. त्यामुळे मुंबईतील गुणवान हॉकीपटूंसमोर नोकरीचा प्रश्न निर्माण होईल. पश्‍चिम तसेच मध्य रेल्वे आणि नौदलाने यापूर्वीच मुंबईबाहेरील खेळाडूंना घेण्यास सुरुवात केली आहे. याकडे ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते मणीपंडे सोमय्या यांनी लक्ष वेधले. मुंबईने 2010 मध्ये राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. त्या वेळीच नव्हे, तर अजूनही मुंबई खेळाडूंकडे आदराने पाहिले जाते. राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईचा चांगलाच दबदबा असतो. आता हे सर्व संपले आहे, अशी खंत मुंबईचे माजी कर्णधार कॉनरॉय रेमेडोज यांनी व्यक्त केली. दरम्यान, धनराज पिल्ले, मर्विन फर्नांडिस, मार्सेलस गोम्स, वीरेन रस्किन्हा, एलिझा नेल्स, सेल्मा डिसिल्वा यांसारख्या मुंबईतील दिग्गज हॉकीपटूंनी मुंबई हॉकीची स्वतंत्र ओळख ठेवण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा तसेच हॉकी इंडियाचे अध्यक्ष मुश्‍ताक अहमद यांना विनंती केली आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलिया होणार आत्मनिर्भर…वाचा कसे ते

क्रिकेटमध्येही घडले होते, पण… 

भारतीय क्रिकेट मंडळात लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे ठरले, त्या वेळी मुंबई क्रिकेट संघटनेबाबतही हाच प्रश्न झाला होता. त्या वेळी मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ यांची एकच संघटना असावी, असे ठरले होते; पण भारतीय मंडळाने यांची अंमलबजावणी केली नाही. विविध संघटनांनी यास न्यायालयात आव्हान दिले आणि हे भारतीय क्रिकेट मंडळात अंमलात आले नाही. “”भारतीय क्रिकेट मंडळ भारतीय ऑलिंपिक संघटनेस संलग्न नाही, त्याच वेळी हॉकी इंडिया आहे. त्यामुळे आम्हाला निर्णयाचे पालन करावेच लागेल,” असे राठोड यांनी सांगितले. 

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण : डी सिल्वा नंतर कुमार संगकाराला समन्स

हॉकी संघर्षाचा परिणामही 

भारतीय हॉकीत काही वर्षांपूर्वी हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी महासंघ यांच्यात संघर्ष सुरू होता. त्या वेळी हॉकी महाराष्ट्र हॉकी इंडियाशी संलग्न झाले, तर मुंबई हॉकी संघटनेने भारतीय हॉकी महासंघांशी संलग्नता कायम ठेवली. हॉकी इंडियास आंतरराष्ट्रीय महासंघाची तसेच केंद्रीय क्रीडा खात्याची मान्यता मिळाल्यानंतर काही वर्षात मुंबई संघटनेने हॉकी इंडियाकडे संलग्नतेसाठी अर्ज केला. त्यांना सहसदस्यत्त्व देण्यात आले; मात्र आता एक राज्य एक संघटना नियमामुळे हे रद्द झाले आहे. बंगळूरनेही कर्नाटक संघटनेसह जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Source: https://www.sakalsports.com/mumbai-hockey-association-withdraw-their-associate-membership-and-recognise-hockey-maharashtra-state