मुंबई बातम्या

मुंबईत रात्री संचारबंदी, पोलिसांचा मोठा निर्णय – Times Now Marathi

प्रातिनिधीक फोटो&  | & फोटो सौजन्य:&nbspPTI

थोडं पण कामाचं

  • मुंबईत रात्री संचारबंदी, मुंबई पोलिसांची माहिती 
  • रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत मुंबईकरांना घराबाहेर पडण्यास बंदी 
  • केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना नागरिकांनाच प्रवासाची परवानगी 

Section 144 in Mumbai city: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला (Mumbai) कोरोनाचा (Corona) विळखा घट्ट होत आहे. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या ही वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत रात्री संचारबंदी (Section 144) लागू करण्यात आली आहे. आज (१ जुलै) पासून ही संचारबंदी लागू होत असून १५ जुलैच्या रात्रीपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. 

रात्री ९ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी 

मुंबई पोलिसांनी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या संचारबंदीमधून केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नागरिकांना यामधून वगळण्यात आले आहे. म्हणजेच संचारबंदीच्या काळात इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी असणार आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी माहिती दिली आहे. 

संचारबंदीतून कोणाला सूट?

  1. अन्न, भाजीपाला, दूध पुरवठा, रेशन, किराणा दुकान यांना संचारबंदीतून सूट 
  2. रुग्णालय, मेडिकल, फार्मा कंपनी, लॅब, नर्सिंग महाविद्यालये, प्रयोगशाळा, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना सूट 
  3. दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेतील कर्मचारी 
  4. वीज, पेट्रोलियम, तेल आणि ऊर्जा संबंधित 
  5. बँकिंग, स्टॉक एक्सजेंच, सेबी नोंदणीकृत पदाधिकारी 
  6. आयटी आणि आयटी कंपनीशी संबंधित सेवा, डेटा सेंटर सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रदान करणारे कर्मचारी  
  7. प्रसारमाध्यमांचे कर्मचारी, प्रतिनिधी 
  8. बंदरे
  9. अन्न, किराणा सामान आणि जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी देणाऱ्या सेवा 
  10. ई-कॉमर्स कंपन्या केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी 
  11. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 
  12. वरील सेवांशी संबंधित माल आणि मनुष्यबळ वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो

२ किलोमीटरच्या बाहेर जाण्यास मज्जाव

दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना एक आवाहन केलं होतं. त्यानुसार विनाकारण घराबाहेर न पडण्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. विनाकारण घराच्या परिसरापासून दोन किलोमीटरच्या बाहेर फिरल्यास कारवाई करण्यात येणार असं म्हटलं होतं. त्यानुसार पोलीस कारवाई सुद्धा करत आहेत. मात्र, यामधून मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नागरिकांना सूट दिली आहे.

बातमीची भावकी

ठाणे, मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ठाणे महानगरपालिकेने २ जुलै सकाळी ७ वाजल्यापासून ते १२ जुलैच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधील अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर तिकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सुद्धा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन १ जुलै २०२० ते १० जुलै २०२० या कालावधील मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू असणार आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/section-144-curfew-imposed-in-mumbai-city-from-9-pm-to-5-am-till-15-july-amid-covid19/300832