मुंबई बातम्या

कोल्हापूरहून मुंबई, तिरूपती विमानसेवा जुलैमध्येही “लॉक’च – Sakal

उजळाईवाडी : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर ते मुंबई तसेच कोल्हापूर ते तिरुपती विमान सेवा अजूनही बंदच आहे. कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाकडून या शहरांची विमान वाहतूक यापूर्वी एक जुलैपासून सुरू करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. परंतु या दोन्ही विमानसेवा सुरू करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली. 

परंतु तिरुपतीसाठी इंडिगो एअरलाइन्स व मुंबईसाठी ट्रुजेट या कंपन्यांच्या संकेतस्थळावर ऑगस्टपासूनचे बुकिंग सुरू असल्याने ऑगस्टमध्ये कोल्हापूरहून मुंबई व तिरुपतीसाठी विमान सेवा सुरू होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशातील नागरी विमान वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होत्या. 25 मे पासून विमानसेवा हळूहळू सुरू झाल्या आहेत. 

कोल्हापूरहून कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बंगळूर आणि कोल्हापूर-तिरुपती तीन फ्लाईटद्वारे विमानसेवा सुरू होती. दिवसातून आठ विमानांची ये-जा या काळात सुरू होती. परंतु कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेसाठी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली. तसेच कोरोना हॉस्पॉट ठरलेल्या मुंबईची विमानसेवा सुरुवातीपासूनच बंद होती. ही विमानसेवा एक जुलैपासून सुरू होण्याची शक्‍यता वर्तवली जात होती. परंतु देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर विमानतळावरून मुंबई व तिरुपती या दोन्ही शहरांची विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून अजून कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत. 

कोल्हापूर-मुंबईसाठी ट्रू जेट या कंपनीमार्फत विमानसेवा पुरवली जाते तर तिरुपतीसाठी इंडिगो एअरलाइन्स या कंपनीमार्फत विमानसेवा पुरवण्यात येते. या दोन्ही कंपन्यांच्या संकेतस्थळावर मुंबई व तिरुपती विमान प्रवासाच्या बुकिंग संदर्भात चौकशी केली असता 31 जुलैपर्यंत कोणत्याही फ्लाइट उपलब्ध नसल्याचे पाहावयास मिळते तर एक ऑगस्ट पासूनच्या प्रवासाचे बुकिंग या कंपन्यांच्या संकेतस्थळावर करता येते. 

परतावा नाही, कधीही प्रवास करा… 
एक ऑगस्ट पासून कंपन्यांच्या संकेतस्थळावर विमान प्रवासाचे बुकींग करता येत असले तरीही त्या दिवसापासून विमान सेवा सुरू होईल याची निश्‍चिती नाही. परंतु बुकींग केलेल्या दिवसाचे विमान रद्द झाल्यास ग्राहकांना रोख परतावा करण्याऐवजी वर्षभरात ही रक्कम वापरून कधीही प्रवास करण्याची सूचना संकेतस्थळावरून ग्राहकांना मिळत आहेत. 

दृष्टिक्षेप 
– जुलैपासून विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना नाहीत 
– कोरोनामुळे कोल्हापुरातील विमानसेवा बंदच 
– विमान कंपन्यांच्या संकेतस्थळावर ऑगष्टमध्ये बुकींग 
– कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा अल्प प्रतिसादामुळे बंद 

Source: https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/mumbai-tirupati-airlines-also-locked-315011