मुंबई बातम्या

एकट्या मुंबई-दिल्लीत ४० टक्के कोरोना मृत्यू – मुंबई लाइव्ह

मागील २४ तासांमध्ये १६ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,५६,१८३ वर जाऊन पोहोचली आहे. यातील १,८३,०२२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून २,५८,६८५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे १४,४७६ जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. देशातील इतर शहरांची तुलना करता (The city of Mumbai and Delhi account for more than 40 per cent of the total number of deaths reported in the country) केवळ मुंबई आणि दिल्ली या २ शहरांमध्येच एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या ४० टक्के रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत १५,९६८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,५६,१८३ वर गेली आहेत. त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा वाटा मोठा आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ३२१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २४८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून १.३९ लाखांवर गेली आहे. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यातही एकट्या मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ६८,४१० इतकी आहे. तर ३८४४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – धक्कादायक! KEM रुग्णालयात गेल्या ३६ दिवसांत ४६० कोरोना मृत्यू

दिल्लीमध्येही देखील आतापर्यंत ६६,६०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तिथं २३०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने तिथं रुग्णालयांच्या खाटा आणि इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवायला लागली आहे. मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही शहरं दाट लोकवस्ती असलेली आहेत. यामुळे इथं कोरोनाला अटकाव घालणं प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना संबंधिची खबरदारी न घेताच रस्त्यावर उतरणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. या दोन्ही शहरांत कोरोना आपल्या उच्चांकी स्थितीत जाऊन पोहोचला आहे. 

भारतातील एकूण लोकसंख्येचा विचार करत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. प्रति १ लाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे एक मृत्यू होत आहे. जागतिक मृत्यूदराच्या (६.०४ टक्के) तुलनेत हा मृत्यूदर अत्यंत कमी असल्याचा मंत्रालयाचा दावा आहे. केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी ठेवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे, असंही आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. 

हेही वाचा – वांद्रे, माटुंगा, भायखळा, वडाळा कोरोनामुक्तीच्या दिशेने

Source: https://www.mumbailive.com/mr/health/the-city-of-mumbai-and-delhi-account-for-more-than-40-per-cent-of-the-total-number-of-deaths-reported-in-the-country.-51814