मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांसाठी तो मुंबईतच चढला एव्हरेस्टची उंची – Loksatta

करोनाकाळात ट्रेकबिकला सोडाच, घराबाहेर पडणंही मुश्कील होऊन बसलं आहे. या काळात मुंबई पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी एका गिर्यारोहक पठ्ठ्याने एव्हरेस्ट चढायचं ठरवलं. आणि तेही मुंबईत.
चक्रवलात ना? चक्रावण्यासारखीच आहे ही गोष्ट. पण खरीदेखील आहे. मुंबई पोलिसांचा सन्मान करण्यासाठी मुंबईतच एव्हरेस्टचं शिखर गाठणाऱ्या २७ वर्षीय मिथिलेश पाटीलची ही कामगिरी करोनापेक्षाही जगावेगळी म्हणावी अशी आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या मिथिलेश पाटीलचे आजोबाही मुंबई पोलीस होते आणि वडीलही मुंबई पोलिसांमध्ये काम करतात. आपल्या आईच्या वाढदिवसासाठी दरवर्षी हिमाचल प्रदेशमधून मुंबईत येणारा मिथिलेश यावर्षी नेहमीसारखा आला आणि टाळेबंदीमुळे अडकून पडला. टाळेबंदीत तो वडिलांचं पर्यायाने मुंबई पोलिसांचं रोजचं काम बघून भारावून गेला. त्यांचं कौतुक करण्यासाठी त्याने मुंबईतच एव्हरेस्टची उंची सर करायचं ठरवलं. त्यासाठी त्याने मुंबईच्या गोरेगावमधली लोढा फियोरेंझा ही ४५ मजली इमारत निवडली.

मिथिलेश प्रशिक्षित गिर्यारोहक आहे. तो हिमाचल प्रदेशमध्ये पार्वती व्हॅली या बर्फाळ प्रदेशात राहतो. तिथे रोजच्या गरजांच्या वस्तू आणण्यासाठी त्याला त्या डोंगराळ प्रदेशातला दगडधोंड्याचा नऊ किलोमीटरचा रस्ता रोज चढावा उतरावा लागतो.

या ४५ मजली इमारतीवर तो ३० वेळा चढला उतरला. म्हणजे झाले १ हजार ३४५ मजले. दोन मजले सहसा १४ फुटांचे असतात. म्हणजे मिथिलेशने १८ हजार ९०० फुटांचं अंतर पार केलं. त्याने दुसऱ्या फेरीमध्ये ३८ मजले १९ वेळा चढउतार केले. म्हणजे झाले ७३४ मजले. आणि १० हजार १३६ फूट.

म्हणजे आधीच्या फेरीमधले १८ हजार ९०० फूट आणि नंतरच्या फेरीमधले १० हजार १३६ फूट मिळून झाले २९ हजार ३६ फूट. या चढउतारादरम्यान तो फक्त पाणी पिणं, सुका मेवा खाणं आणि इन्स्टाग्राम अपडेट करणं यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्याच वेळासाठी थांबत असे. आपला हा उपक्रम त्याने मुंबई पोलिसांना समर्पित केला आहे.

एव्हरेस्टची उंची ८ हजार ८४८ मीटर म्हणजेच २९ हजार ३० फूट आहे. म्हणजे मिथिलेशने एव्हरेस्टपेक्षाही थोडी जास्तच उंची सर केली आहे. इन्स्टाग्रामवर तो माउंटन मॅन मिथिलेश या नावाने आहे. २०१७ पर्यंत तो मुंबईत एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत होता. पण नंतर मग इथली गर्दी, गडबड, गोंधळ हे सगळं सोडून तो गिर्यारोहण तसंच आयुष्यातली शांतता अनुभवण्यासाठी हिमाचल प्रदेशात निघून गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 24, 2020 2:47 pm

Web Title: for the mumbai police he climbed the height of everest in mumbai msr 87

Source: https://www.loksatta.com/vishesha-news/for-the-mumbai-police-he-climbed-the-height-of-everest-in-mumbai-msr-87-2196040/