मुंबई बातम्या

मुंबईत मनपाचे ‘कोरोना मिशन झिरो’ सुरू – Times Now Marathi

मुंबईत मनपाचे ‘कोरोना मिशन झिरो’ सुरू& 

थोडं पण कामाचं

  • मुंबईत मनपाचे ‘कोरोना मिशन झिरो’ सुरू
  • घरीच ऑक्सिजन थेरपी करणार
  • मुंबईत कोरोनाचा मोठा धोका

मुंबई: मुंबई मनपाने (mcgm) कोरोनाविरुद्ध मिशन झिरो (mission zero) ही मोहीम सुरू केली आहे. सुरुवातीला दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, मुलुंड आणि भांडुप या सात ठिकाणी ३ आठवडे मिशन झिरो मोहीम राबवणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. 

काय आहे ‘मिशन झिरो’?

‘मिशन झिरो’ अंतर्गत मनपाच्या ५० मोबाइल दवाखाना व्हॅन कोरोना रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये फिरणार आहे. ज्या भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळले त्या भागांमध्ये घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग केले जाईल. पुरेशी खबरदारी घेऊन संशयितांची मोबाइल दवाखाना व्हॅनची टीम तपासणी करेल. कोरोनाबाधीत आढळलेल्यांना डॉक्टर लगेच आवश्यक तो सल्ला देतील. एकही कोरोना रुग्ण सुटू नये यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. परिसरातले सर्व बाधीत आणि  संभाव्य कोरोना रुग्ण यांच्यावर वेळेत उपचार सुरू झाले तर कोरोना पसरणार नाही, असा विश्वास मनपाने व्यक्त केला आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करुन संसर्ग पसरण्याआधीच सर्व कोरोना रुग्णांना उपचारासाठी क्वारंटाइन अथवा हॉस्पिटलमध्ये दाखल करणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले.

…तर घरीच ऑक्सिजन थेरपी करणार

वैद्यकीय तपासणीत एखाद्याची ऑक्सिजन पातळी ९५ किंवा त्यापेक्षा कमी आढळल्यास संबंधितावर तातडीने घरातच ऑक्सिजन थेरपी सुरू केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल. 

अंधेरीत मोहिमेचा शुभारंभ

मुंबई मनपाच्या ‘मिशन झिरो’ मोहिमेचा शुभारंभ अंधेरी येथील शहाजी राजे भोसले क्रीडासंकुल येथे झाला. मुंबई शहरचे  पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी मुंबई मनपा, महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त चहल यांना शुभेच्छा दिल्या.

मुंबईत कोरोनाचा मोठा धोका

मुंबईत ६७ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत आढळले आहेत. यापैकी २९ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. ज्या भागांमध्ये ‘मिशन झिरो’ मोहीम राबवली जाणार आहे अशा सर्व भागांमध्ये रुग्णवाढीचा वेग दोन-तीन आठवडे एवढा आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, मुलुंड, भांडुप या सात ठिकाणी दाटीवाटीची लोकवस्ती आहे. सार्वजनिक शौचालयांचा वापर जिथे होतो असे परिसर जास्त आहेत. याच कारणांमुळे मुंबईतील ठराविक भागांमध्ये वेगाने कोरोना पसरत आहेत. या सकंटावर मात करण्यासाठी मनपाने ‘मिशन झिरो’ सुरू केले आहे.

बातमीची भावकी

मालाडमध्ये जास्त खबरदारी घेणार, आयुक्तांनी दिल्या सूचना

मालाडमध्ये रविवारीच साडेतीन हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधीत असल्याचे आढळले. यानंतर मनपा आयुक्त चहल यांनी मालाडच्या निवडक भागांमध्ये मनपा करत असलेल्या कामचा आढावा घेतला तसेच दिंडोशी, संतोष नगर, कुरार गाव, अप्पापाडा, कोकणीपाडा सोमवार बाजार, मढ परिसरात प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच संपूर्ण मुंबईत कंटेनमेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोर पालन होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mcgm-start-mission-zero-against-corona-in-mumbai/299544