मुंबई बातम्या

क्रिकेट स्कोअरर ते कोविड योद्धा! विरारचे दीपक जोशी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सलग करताहेत डय़ुटी – Saamana

मुंबई, महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील कोरोना स्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलिस, डॉक्टर्स, नर्स यांसारखे अनेक कोविड योद्धे सर्वस्व पणाला लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरार येथे वास्तव्य करणारे दीपक जोशी 24 मे पासून सलग बॉम्बे हॉस्पीटलमध्ये काम करून आपले कर्तव्य बजावत आहेत. एक्स रे टेक्नीशियन म्हणून काम करणारे दीपक जोशी क्रिकेट स्कोअरर म्हणूनही आपला छंद जोपासत आहेत हे विशेष. यावेळी दैनिक ‘सामना’ने त्यांच्याशी संवाद साधत गेला महिनाभर ते करीत असलेल्या श्रमाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मार्चच्या अखेरीस महाराष्ट्रासह हिंदुस्थानात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 23 मेपर्यंत दीपक जोशी घरीच होते. 24 मेपासून त्यांना ऑफिसला येण्याचे सांगण्यात आले. तिथपासून थेट 21 जूनपर्यंत त्यांनी आपली डय़ुटी केली. बॉम्बे हॉस्पीटलमधील चार मजले हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. दीपक जोशी ज्या विभागात काम करताहेत, त्या विभागात काम करणारे अधिकारीही कोरोना रुग्णांच्या संपर्कात येत असत. अशाप्रसंगी दीपक जोशी यांनी धैर्याने आपले काम केले. 22 जूनला मिळालेल्या सुट्टीनंतर ते पुन्हा कामावर रूजू होणार आहेत. पण ट्रेनने ये जा करण्यापेक्षा हॉस्पिटलनजीक राहण्याची सोय होते का याची ते चाचपणी करताहेत.

328 सामन्यांचा दांडगा अनुभव

दीपक जोशी यांच्यासाठी 1992 सालं अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्याच वर्षी ते क्रिकेट स्कोअरर म्हणून पुढे आले, अन् त्याच वर्षी ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नोकरीलाही लागले. तिथपासून आतापर्यंत त्यांनी 328 सामन्यांमध्ये स्कोअरर म्हणून काम पाहिले. यामध्ये 11 कसोटी, 21 वन डे, 5 टी-20 आणि 47 आयपीएल सामन्यांचाही समावेश आहे.

Source: https://www.saamana.com/cricket-scorer-dipak-joshi-corona-virus-virar-hospital/