मुंबई बातम्या

मुंबई पोर्ट ट्रस्टचा ७० बेडचा कोविड केअर आश्रम – Times Now Marathi

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील कोविड केअर आश्रम& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई पोर्ट ट्रस्टचा ७० बेडचा कोविड केअर आश्रम
  • भरपूर मोकळी जागा, सूर्यप्रकाश आणि हवेशीर परिसर
  • हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी कोविड केअर आश्रम

मुंबईः मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (Mumbai Port Trust) आवारात २ एकरच्या भूखंडावर ७० बेडचा कोविड केअर आश्रम (Covid Care Ashram) सज्ज करण्यात आला आहे. या आश्रमात ७० कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांवर आश्रमात योग साधना, ध्यान, मानसिक शांततेसाठी प्रवचन आणि औषधोपचार अशा प्रकारे उपचार करण्याची व्यवस्था आहे. 

आश्रमातील उपचारांची व्यवस्था

पोर्ट ट्रस्टमधील कोविड केअर आश्रमात दररोज एक तास योग साधना, ९० मिनिटे ध्यानधारणा, अर्धा तास मानसिक शांततेसाठी प्रवचन आणि औषधोपचार करण्याची व्यवस्था आहे. कोरोना रुग्णांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांचे मानसिक संतुलन ढळू नये याची पुरेशी काळजी प्रवचनकार घेणार आहेत. 

भरपूर मोकळी जागा, सूर्यप्रकाश आणि हवेशीर परिसर

आश्रम हवेशीर आहे. भरपूर मोकळी जागा, पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील याची काळजी आश्रम तयार करताना घेण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्यांचे पालन करुन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले काढे आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे रुग्णांना नियमित देण्याची व्यवस्था आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून लवकर कोरोना रुग्ण बरे होतील, असा विश्वास कोविड केअर आश्रमाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कोरोना रुग्णांना त्यांचे घरुन आणलेले कपडे आश्रमात वापरता येणार आहेत. आश्रमात असताना एखाद्या रुग्णाची तब्येत ढासळली तर त्याला तातडीने ऑक्सिजन देण्याची व्यवस्था आश्रमात करण्यात आली आहे. 

हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी कोविड केअर आश्रम

मुंबईत २९ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजार आणि दूषित पाण्यामुळे पसरणारे आजार झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कोरोना रुग्णांचा हॉस्पिटलवरील सध्याचा ताण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आवारात ७० बेडचा कोविड केअर आश्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातमीची भावकी

मुंबई पोर्ट ट्रस्टची वैद्यकीय सेवा

मुंबई पोर्ट ट्रस्टचे लाखभर कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पोर्ट ट्रस्टचे एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कायम गर्दी असते. कोरोना संकटाचे भान ठेवून या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी १२० बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात ऑक्सिजन पुरवण्यासाठी मध्यवर्ती यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर रुग्णांना हाताळण्यासाठी २५ बेडचे स्वतंत्र छोटेखानी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत पोर्ट ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे अथवा कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळल्यामुळे ६११ जण दाखल झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मुंबईतील कोरोना संकटाचा अंदाज घेऊन ७० बेडचा कोविड केअर आश्रम सज्ज करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया (Mumbai Port Trust Chairman Sanjay Bhatia) यांनी दिली.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-port-trust-sets-70-bed-covid-care-ashram/299499