मुंबई बातम्या

वाढत्या रुग्णसंख्येमुळे उत्तर मुंबईत संपूर्ण टाळेबंदी – Loksatta

११५ प्रतिबंधित क्षेत्रे;  ९०८ इमारतींवर लक्ष

मुंबई: अवघ्या काही दिवसांमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढल्यामुळे उत्तर मुंबईत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. कांदिवली ते दहिसर दरम्यानची ११५ प्रतिबंधित क्षेत्रे आणि ९०८ टाळेबंद इमारतींवर पालिकेचे लक्ष आहे.

उत्तर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टाळेबंद इमारतींमधील नियमांच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार असून पालिकेचे नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात अवघ्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आजघडीला कांदिवलीमध्ये २०९०, मालाडमध्ये ३३७८, बोरिवलीमध्ये १८२५, तर दहिसरमध्ये १२७४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्ण दुपटीचा काळ कांदिवलीत २५, मालाडमध्ये १९, बोरिवलीत १८, तर दहिसरमध्ये १५ दिवस आहे. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे कांदिवली ते दहिसर दरम्यान ११५ परिसर प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. रुग्ण सापडल्याने ९०८ पैकी काही इमारती संपूर्ण, तर काही अंशत: टाळेबंद करण्यात आल्या आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रांतील रहिवासी नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळल्याने पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी चर्चा झाली. या वेळी प्रतिबंधित क्षेत्रे आणि टाळेबंद केलेल्या इमारतींमधील रहिवाशांवरील र्निबधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीत रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत टाळेबंद करण्यात येईल. तेथील दुकानेही बंदच राहतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

..तर कठोर कारवाई

कोकणीपाडा, तानाजी नगर, शिवाजी नगर, क्रांती नगर, कुरार, दिंडोशी, आप्पा पाडा, पिंपरी पाडा, संतोष नगर आदी परिसरांमध्ये पूर्ण टाळेबंदी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. उत्तर मुंबईमधील ३४ वस्त्यांत संपूर्ण टाळेबंदी करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा दोन ते तीन वस्त्या असून तेथे राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. नियम न पाळणाऱ्या ८०० हून अधिक जणांविरुद्ध  गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई आणखी कडक करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.

रुग्णांची संख्या वाढत असल्याने उत्तर मुंबईतील प्रतिबंधितक्षेत्रात पूर्ण टाळेबंदी करण्यात येत आहे. तेथील केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यात येणार आहेत. रुग्ण सापडल्यानंतर ‘झोपू’अंतर्गत इमारत पूर्णपणे टाळेबंद करण्यात येणार आहे. सोसायटय़ांमध्येही मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत असून त्यांच्यावरही कडक र्निबध घालण्यात आले आहेत.

– विश्वास शंकरवार, पालिका उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 20, 2020 4:40 am

Web Title: complete lockdown in north mumbai due to increasing number of patients zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/complete-lockdown-in-north-mumbai-due-to-increasing-number-of-patients-zws-70-2192311/