मुंबई बातम्या

मुंबई पालिकेच्या शिक्षकांना वेतन कपातीची धास्ती – Loksatta

‘शाळेत हजर व्हा, नाहीतर वेतन कपात करण्यात येईल’ अशी भूमिका मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतल्यामुळे शिक्षक धास्तावले आहेत. शाळेपर्यंत पोहोचायचे कसे? शाळेच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात संक्रमण आहे असे प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहेत. काही शिक्षकांना वेतनकपातीच्या भीतीने विलगीकरणासाठी दिलेल्या शाळेबाहेर उभे राहून दिवस घालवण्याची वेळ आली. शैक्षणिक वर्षांला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट करत पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले. शाळेत हजर नाही झालात तर विनावेतन रजा गृहित धरण्यात येईल असेही पालिकेच्या शिक्षण विभागाने सांगितले. व्हॉट्स अ‍ॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून शिक्षकांना संदेश देण्यात आले. शाळेत हजर राहून ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. मात्र, त्यासाठी एकाचवेळी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावण्यात येत आहे.

शाळेबाहेर उभे राहून काम

विलगीकरण कक्षासाठी महापालिकेच्या अनेक शाळा देण्यात आल्या आहेत. वेतन कपातीच्या धास्तीने शिक्षकांनी शाळांमध्ये हजेरी लावली. मात्र विलगीकरण कक्षात शिक्षकांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे शाळेच्या प्रवेशदारा बाहेर उभे राहून शिक्षकांना कामाचे तास पुर्ण करण्याची वेळ आली. उलटसुलट आदेश आणि या गोंधळावर शिक्षक संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांना घरून काम करण्याची मुभा द्यावी अशी संघटनांची मागणी आहे.

प्रतिबंधित भागांतील शाळांत कसे जायचे

राज्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये सुरू होणार आहेत. मात्र, त्यातही अतिसंक्रमीत भागांतील (रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्र) शाळा गृहित धरलेल्या नाहीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील अनेक भाग प्रतिबंधित आहेत. या भागाताली शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक धास्तावले आहेत. ‘घाटकोपरयेथील एका शाळेजवळ रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांची ये जा सतत दिसत असते. परिसरात अनेक रुग्ण सापडले आहेत,’ असा अनुभव एका शिक्षकांनी सांगितला.

प्रवासाची समस्या

रेल्वे सुरू करण्यात आली असली तरी ती सर्व ठिकाणी थांबत नाही. रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठीही वाहतूक उपलब्ध नाही. बससाठीही गर्दी आहे वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नसताना शाळांपर्यंत कसे पोहोचायचे असा प्रश्न उपनगरातील शिक्षकांना पडला आहे. अनेक शिक्षक अजूनही त्यांच्या गावी अडकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 19, 2020 12:09 am

Web Title: mumbai municipal corporation teachers threatened with pay cut abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-municipal-corporation-teachers-threatened-with-pay-cut-abn-97-2191386/