मुंबई बातम्या

मुंबई पालिकेत शवपिशव्या घोटाळा? – Loksatta

प्रतिनग १,३५० रुपयांऐवजी ६,७१० रुपयांनी खरेदी; भाजपची चौकशीची मागणी

करोना रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक शव पिशव्यांसाठी प्रति पिशवी ६७१० रुपये खर्च केले असून केईएम रुग्णालयाला मात्र ती पिशवी अवघ्या १३५० रुपयांना मिळाल्याचे समोर आले आहे.

एकाच वस्तूच्या दरातील ही प्रचंड तफावत संशयास्पद असून महापालिके च्या शव पिशव्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप करत या व्यवहाराच्या चौकशीची मागणी मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केली आहे.

मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांसाठी प्लास्टिक शव पिशव्यांची खरेदी मुंबई महानगरपालिकेने केली. एका शवपिशवीसाठी ६७१० रुपयांचा दर मान्य करण्यात आला. प्रत्यक्षात या पिशव्यांचा दर खूपच कमी आहे.

मुंबईतीलच केईएम रुग्णालयाने जून २०२० मध्ये अशा ५५  शवपिशव्या खरेदी के ल्या असता १३५० रुपये अधिक जीएसटी अशा दराने त्या मिळाल्या. केईएम रुग्णालयाने अवघ्या ५५ शव पिशव्या घेतल्या तर १३५० रुपयांच्या दराने मिळाल्या. मग जवळपास पाच हजार शव पिशव्या खरेदी करणाऱ्या मुंबई महापालिकेला ६७१० रुपयांचा खर्च कसा आला. दरातील ही प्रचंड तफावत या शव पिशव्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे दर्शवते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी  विवेकानंद गुप्ता यांनी केली आहे.

प्रक्रिया रद्द

याबाबत विचारणा केल्यावर ६७१० रुपयांनी पिशव्या खरेदी करण्याची प्रक्रिया आता रद्द केल्याचे सांगण्यात आले. मात्र, यापूर्वी जवळपास पाच हजार शव पिशव्यांची खरेदी त्या अव्वाच्या सव्वा दराने झाली त्याचे काय, असा सवालही गुप्ता यांनी उपस्थित केला.

या खरेदीसाठी जबाबदार असलेल्या उपायुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणीही गुप्ता यांनी केली आहे. मुंबई महापालिकेला वाढीव दराने शव पिशव्या देणाऱ्या कंत्राटदाराचे कुणाशी लागेबांधे आहेत हेही समोर आले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नियमानुसार खरेदीचा पालिकेचा दावा

शव पिशव्यांच्या खरेदीसाठी १० एप्रिल रोजी पहिली निविदा मागवण्यात आली. प्रतिसाद न मिळाल्याने २१ एप्रिल रोजी पुन्हा निविदा काढण्यात आली. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २ मे रोजी तिसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली. अखेर केंद्र सरकारच्या निर्धारित तांत्रिक निकषांनुसार या उत्पादनाची निवड करण्यात आली. प्रतिसाद दिलेल्या देकारांपैकी सर्वात कमी बोली देणाऱ्या संस्थेकडून या प्लास्टिक शव पिशव्या खरेदी करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला. पालिकेने निवड केलेल्या उत्पादनाची केंद्र सरकारच्या संकतेस्थळावर सात हजार ८०० रुपये किंमत दर्शवण्यात आली आहे. पालिके ने ६७१० रुपये दराने त्या खरेदी केल्या. या पिशव्या विशेष असून सर्वसाधारण शव पिशव्यांपेक्षा अधिक सुरक्षित आणि बिनटाकी आहेत. त्यामुळे विषाणूच्या संभाव्य प्रादुर्भावापासून सुरक्षितता मिळू शकेल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 17, 2020 12:27 am

Web Title: corpse bag scam in mumbai municipal corporation abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/corpse-bag-scam-in-mumbai-municipal-corporation-abn-97-2189536/