मुंबई बातम्या

मुंबई, दिल्लीत टाळेबंदीची शक्यता नाही – Loksatta

मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडणाऱ्या मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई आदी शहरांमध्ये टाळेबंदीच्या पर्यायाचा विचार करण्याचा सल्ला केंद्राकडून देण्यात आला असला तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता फेटाळून लावली. मुंबई, पुण्यातही टाळेबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. चेन्नईत मात्र पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले.

करोनाचे रुग्ण सध्या मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर आढळत आहेत. तमिळनाडूमध्ये करोनाचे ४४ हजार रुग्ण असून वाढीचे प्रमाण ४.६ टक्के तर, दिल्लीमध्ये ४१ हजार रुग्ण असून वाढीचे प्रमाण ५.७ टक्के आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिल्लीतील सर्व राजकीय पक्षांची बठक घेऊन मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन केले. एक प्रकारे दिल्लीतील करोनाची परिस्थिती थेट केंद्रीय गृहमंत्रालयाने हाताळण्यास सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झाले.

जास्त रुग्ण आढळणाऱ्या परिसरात निर्बंध लागू करावे, अशी मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने राज्यांना दिली आहेत. मुंबई, पुण्यात पुन्हा टाळेबंदी लागू होणार अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. परंतु मुंबई, पुण्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्याच आठवडय़ात स्पष्ट केले होते. दिल्लीतील वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तशी शक्यता फेटाळून लावली.

चेन्नईत टाळेबंदी पुन्हा लागू करण्यात येत असल्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी जाहीर केले.

दिल्लीतील स्थिती

दिल्लीत आत्तापर्यंत प्रतिदिन ९ हजार चाचण्या घेतल्या जात होत्या पण, आता हे प्रमाण दुप्पट व नंतर तिप्पट केले जाईल. पुढील पाच दिवसांमध्ये नमुना चाचण्या प्रतिदिन १८ हजारांपर्यंत वाढवल्या जातील. खासगी रुग्णालयांमधील ६० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा व या रुग्णांना कमी किमतीत उपचार उपलब्ध करून देण्यासही सांगण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये दिल्लीमध्ये १० हजार नव्या रुग्णांची भर पडली. रविवारी दिवसभरात २,२२४ रुग्णांची वाढ झाली.

आयसीएमआर’ने निष्कर्ष फेटाळले

करोना संसर्ग नोव्हेंबरमध्ये कळस गाठण्याची शक्यता वर्तवणारा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) फेटाळला आहे. त्यातील निष्कर्ष दिशाभूल करणारे आहेत.तो आयसीएमआरने बनवलेला नाही.  राष्ट्रीय कृती गटाचे सदस्य अहवाल तयार करण्यात सहभागी झाले होते. त्यापकी, अरिवद पांडे यांनी अहवाल मागे घेतल्याचे स्पष्ट केले.

देशात २४ तासांत ११ हजारांहून अधिक रुग्ण

सलग तिसऱ्या दिवशी देशभरातील करोना रुग्णांमध्ये ११ हजारांहून अधिक वाढ  नोंदविण्यात आली. देशात गेल्या २४ तासांत ११ हजार ५०२ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या ३ लाख, ३२ हजार ४२४ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३०७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ९,५२० वर पोहोचली. एकूण रुग्णांपकी १ लाख ६९ हजार ७९८ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.०८ टक्क्यांवर पोहोचले असून, १ लाख ५३ हजार १०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी आज, उद्या चर्चा

करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवार व बुधवार असे सलग दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान,  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगण आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ही बठक होणार आहे. या राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. मुख्यमंत्र्यांशी होणारी ही सहावी व सातवी बठक असेल.  टाळेबंदी शिथिल करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 16, 2020 12:18 am

Web Title: possibility of a lockdown in mumbai and delhi was ruled out abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/possibility-of-a-lockdown-in-mumbai-and-delhi-was-ruled-out-abn-97-2188445/