मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचा मृत्यू – Loksatta

मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याचे उपायुक्त आणि प्रमुख अभियंता शिरीष दीक्षित यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्याकडे उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) या पदाचीदेखील अतिरिक्त जबाबदारी होती. आदल्या दिवसापर्यंत कामावर असलेल्या दीक्षित यांचा मृत्यू करोनाने झाल्याचा संशय आहे.

टाळेबंदीच्या काळात मुंबई शहराला अविरत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी मनुष्यबळ संख्येचे आव्हान असतानाही समर्थपणे पार पाडली.

अत्यंत मितभाषी असलेले दीक्षित अभियांत्रिकी कौशल्यात निष्णात व पारंगत होते. महापालिकेद्वारे वरळी येथील एन. एस. सी. आय. येथे उभारण्यात आलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ आणि ‘नेस्को’ येथे तयार करण्यात आलेल्या करोना अलगीकरण केंद्रांच्या उभारणीत दीक्षित यांचा मोलाचा वाटा होता.

दीक्षित हे सोमवापर्यंत कामावर हजर होते. त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मात्र आदल्या दिवशी त्यांना थकवा जाणवत होता. सोमवारी मध्यरात्री घरीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना करोनाची बाधा झाली होती असे आढळून आल्याची माहिती इंजिनीअर असोसिएशनचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिली.  दीक्षित यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. पाणीपुरवठा प्रकल्पांपैकी, मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत असणाऱ्या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रिया केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्प यांसारखे अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

‘सर्वच कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करा’

दीक्षित यांच्या अचानक जाण्याने पालिकेचे अभियंते आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेले दोन महिने हे अभियंते आणि कर्मचारी महानगरपालिकेकरिता करोनाशी लढा देत आहेत. त्यामुळे लक्षणे दिसत नसली तरी पालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी राजाध्यक्ष यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 10, 2020 12:26 am

Web Title: death of deputy commissioner of water supply department mumbai municipal corporation abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/death-of-deputy-commissioner-of-water-supply-department-mumbai-municipal-corporation-abn-97-2183248/