मुंबई बातम्या

मुंबईतील दुकाने पूर्ण वेळ खुली – Loksatta

राज्य सरकारने हळूहळू टाळेबंदी शिथिल करण्याबाबत पावले उचलल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी परिपत्रकात सुधारणा करून मुंबईतील मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता अन्य बाजारपेठा आणि दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर उद्यानांमधील झोपाळे आदी, तर खुल्या व्यायामशाळांमधील बार आणि अन्य उपकरणांच्या वापरास हिरवा कंदील दाखवला आहे. तर शैक्षणिक संस्थांना शिक्षणेतर कामांसाठी परवानगी देण्यात आली आहे.

टाळेबंदी शिथिल करण्याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी २ जून रोजी परिपत्रक जारी केले होते. चहल यांनी या परिपत्रकात सुधारणा केली आहे. राज्य सरकारने खासगी कार्यालयांमध्ये १० कर्मचारी अथवा एकूण संख्येच्या १० टक्के यापेक्षा जे अधिक असेल तितक्या कर्मचाऱ्यांना अटीसापेक्ष उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरणाचे नियम कटेकोरपणे पाळण्याची सूचना सुधारित परिपत्रकात करण्यात आली आहे.

मुंबईमधील मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून अन्य बाजारपेक्षा आणि दुकाने पूर्वीप्रमाणे नियमित वेळेत खुली ठेवण्याची मुभा आयुक्तांनी दिली आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एक दिवस, तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी खुली ठेवता येणार आहेत. तसेच गर्दी होऊ नये यासाठी सामाजिक अंतराचा नियम, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बाजार / दुकान मालक संघटनेला व्यवस्थापन करावे लागणार आहे. तसेच दुकाने सोमवार ते शनिवार खुली ठेवावी. मात्र रविवारी दुकाने बंद ठेवण्याची सूचना सुधारित परिपत्रकात करण्यात आली आहे. तसेच रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत मुंबईत संचारबंदी लागू राहणार आहे.

राज्य सरकारने व्यायामासाठी समुद्रकिनारे आणि उद्याने अटीसापेक्ष खुले केले. आता पालिका आयुक्तांनी सुधारित परिपत्रकात उद्यान, खुली व्यायामशाळा आदी ठिकाणी खुल्या जागात असलेले झोपाळे, बार आदींचा वापर करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली आहे.

शिक्षणेतर कामांसाठी परवानगी

शिक्षणेतर कामांसाठी विद्यापीठ, महाविद्यालये आणि शाळा सुरू करण्यास आयुक्तांनी सुधारित परिपत्रकात परवानगी दिली आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे, निकाल जाहीर करणे आदी कामे करता येणार आहेत.

वृत्तपत्र छपाई आणि वितरणास परवानगी

पालिका आयुक्तांनी आपल्या सुधारित परिपत्रकात वृत्तपत्रांची छपाई आणि त्यांच्या वितरणासही परवानगी दिली आहे. घरोघरी वृत्तपत्रांचे वितरण करणाऱ्यांना मुखपट्टी लावणे, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतराचा नियम पाळणे बंधनकारक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 10, 2020 12:16 am

Web Title: shops in mumbai are open full time abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/shops-in-mumbai-are-open-full-time-abn-97-2183229/