मुंबई बातम्या

मुंबई विमानतळाची स्थगित केलेली सेवा पूर्ववत सुरु – Zee २४ तास

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची स्थगित केलेली सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे. याआधी खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरची उड्डाणे संध्याकाळी ७ वाजेपर्यंत स्थगित केली होती, मात्र संध्याकाळी ६ वाजल्यापासून सेवा पूर्ववत सुरु झाली आहे. 

मुंबईत चक्रीवादळाचा प्रभाव  काल दुपारनंतर वाढला होता. वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु झाल्याने दुपारी अडीच ते सायंकाळी ७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने घेतला होता. मात्र वादळाचा जोर ओसरल्याने काल सायंकाळी ६ वाजता विमान सेवा पूर्ववत झाली.

चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईत दिसून आला. वाऱ्यासह पावसाचा जोर वाढल्याने खबरदारी घेण्यात आली होती. कोणताही धोका नको म्हणून विमानांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने घेतला. विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) सल्ल्याने दुपारी अडीच ते सायंकाळी ७ पर्यंत विमानतळाची धावपट्टी बंद करण्यात आली. परंतु वादळाचा जोर लवकर ओसरला. त्यानंतर विमान उड्डानाला परवानगी देण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या विमानतळावरुन सध्या दरदिवशी केवळ ५० विमानांचीच ये-जा सुरु आहे. मात्र, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर उड्डाणांची संख्या आधीच आणखी कमी करण्यात आली होती. बुधवारी येथून केवळ ११ विमाने रवाना होणार होती. तर, आठ विमानांचे आगमन होणार होते. प्रत्यक्षात येणारे एक विमान वाढल्याने एकूण २० विमानांची ये-जा झाली. पाच विमानसेवा कंपन्यांनी १२ शहरांसाठी विमान सेवा सुरु केली आहे.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/nisrag-cyclone-hit-%E0%A5%A4-flights-resume-at-mumbai-airport/522650