मुंबई बातम्या

चक्रीवादळानंतर आता मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस – Zee २४ तास

मुंबई : चक्रीवादाळानंतर आता पावसाला चांगली सुरुवात झाली. मुंबई आणि उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांच्या काही भागात पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर नवी मुंबईसह ठाणे शहरातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाने काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा सकाळपासून जोर आहे. दक्षिण मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. तर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे . संपूर्ण मुंबईवर सकाळपासून काळ्या ढगांची छाया दिसून आली. कालपेक्षा मुंबईत आज पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर मुंबईभर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असताना घाटकोपर, कुर्ला, अंधेरी भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळात आहेत. दरम्यान, पालघरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पालघर शहरासह ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे. त्याआधी काल पालघर जिल्ह्यालाही वादळाचा फटका बसला. चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली  तर विजेचे खांब आणि होर्डिंग कोसळले.

पुढील तीन तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी  पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण आणि अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरु झाला. रत्नागिरीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. तर सिंधुदुर्गातही जोरदार पाऊस कोसळत आहे.

दरम्यान, ठाण्यातील काही भागात पावसाने दडी मारली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज शहरात कमाल तापमान ३६ डिग्री सेल्सियस राहील असा अंदाज वर्तविला होता. मात्र, ठाणे शहरात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमानाट घट झालेली पाहायला मिळत आहे.

 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/heavy-rains-in-mumbai-and-suburbs-now-after-cyclone/522656