मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेच्या ९० सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण – मुंबई लाइव्ह

मुंबई महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेतील सुरक्षा विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं दिसून येत आहे. पालिकेच्या सुरक्षा दलातील तब्बल ९० सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी दोन सुरक्षारक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर एका सुरक्षारक्षकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला आहे. 

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून मुंबई महापालिकेची सर्वच यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. कोरोनाविरोधात लढणाऱ्या पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेचे सुरक्षा रक्षकही यातून सुटले नाहीत. 

महापालिकेच्या सुरक्षारक्षकांना कोरोनामुळे २४ तास ड्युटी लावण्यात आली आहे. मुंबई महापालिका मुख्यालय, २४ विभाग कार्यालये, पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, मलनि:सारण, रुग्णालये, प्रसूतिगृहे, मेडिकल कॉलेज, राणीबाग, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त कार्यालये यासह विविध ठिकाणी पालिका सुरक्षारक्षक आपली सेवा बजावत आहेत.

विविध कार्यालयाच्या ठिकाणी या सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वारात येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची ‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ने तपासणी करावी लागत आहे. त्यातून व अन्य माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने या सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ९० सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 


हेही वाचा –

24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या ‘इतकी’ वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

लॉकडाऊनच्या काळाचा रेल्वे प्रशासनाची मोलाची कामगिरी


Source: https://www.mumbailive.com/mr/health/90-security-guards-of-mumbai-municipal-corporation-infected-with-coronavirus-50551