मुंबई बातम्या

Coronavirus : मुंबईत १५१० नवे रुग्ण,५४ जणांचा मृत्यू – Loksatta

मुंबई : मुंबईत शनिवारी आणखी १५१० करोना रुग्णांची नोंद झाल्यामुळे रुग्णसंख्या ३८,२२० झाली. मुंबईत शनिवारी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. करोनाबळींची संख्या १२२७ झाली आहे, तर ३५६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १६,३६४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

शनिवारच्या ५४ बळींपैकी १४ मृत्यू २५ ते २८ मे या कालावधीतील आहेत. यात ३१ पुरुष आणि २३ महिला आहेत. ५४ पैकी १५ रुग्णांना करोनाव्यतिरिक्त अन्य कोणतेही आजार नव्हते. आणखी ८५७ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

सौम्य लक्षणांचे ७५- ८० टक्के रुग्ण

विविध रुग्णालयातील रुग्णांच्या निरिक्षणानंतर असे आढळून आले आहे की, एकूण रुग्णांपैकी ७५ ते ८० टक्के सौम्य लक्षणे असलेले किंवा कोणतीही लक्षणे नसलेले आहेत. १५ ते १७ टक्के रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. केवळ ५ ते ७ टक्के रुग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आणि अन्य आजारही आहेत. मध्यम लक्षणे असलेले आणि गंभीर लक्षणे असलेले रुग्णही बरे होतात, असे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. करोना बाधित असल्याचा अहवाल आल्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

गंभीर रुग्णही करोनामुक्त

मार्च ते मे या दोन महिन्यांत करोनाच्या १३९१ गंभीर रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ९०० रुग्णांची प्रकृती सुधारली आहे, तर ७१८ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. त्यांत ९० वर्षांच्या एका महिलेचाही समावेश आहे.

घरीही उपचार शक्य

कोणतीही लक्षणे नसतील किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणे असतील आणि इतर आजार नसतील तर रुग्ण घरी राहून देखील उपचार घेऊ शकतात. घरात सुविधा असतील, तर केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करून घरीच थांबू शकतात. मात्र घरात सुविधा नसतील, घरे लहान असतील तर आरोग्य खात्याच्या मार्गदर्शनानुसार करोना उपचार केंद्र-२ मध्ये दाखल करता येऊ शकते.

ठाणे जिल्ह्य़ात ३९८ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी  ३९८ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ात  रुग्णांची संख्या ७ हजार ७८१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये ठाणे शहरात सर्वाधिक १५१ आणि नवी मुंबईत ११४ रुग्ण आढळून आले. ठाणे शहरातील १५१, नवी मुंबईत ११४, कल्याण-डोंबिवली शहरातील ३८, उल्हासनगर शहरातील ३०, भिवंडी शहरातील ७, अंबरनाथ शहरातील १७, बदलापूर शहरातील ७, मिरा-भाईंदर शहरातील १८ आणि ठाणे ग्रामीणमधील १६ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १६ जणांचा बळी

दरम्यान ठाणे जिल्ह्य़ात एका दिवसात १६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील मृतांचा आकडा २३९ इतका झाला आहे.

अग्निशमन दलामध्ये चौथा बळी

अग्निशमन दलाच्या कांदिवली केंद्रात कार्यरत आणखी एका जवानाचा करोनाने बळी घेतला आहे. २४ ते ३० मे या कालावधीतील हा चौथा बळी आहे.  कांदिवली केंद्रातील हा जवान सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल होता. उपचार घेत असतानाच शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

राज्यात २९४० नवे रुग्ण

राज्यात शनिवारी २९४० नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६५१६८ झाली. राज्यात करोनामुळे ९९ जणांचा मृत्यू झाला. रुग्णवाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १७.५ दिवसांवर गेला आहे. राज्यातील बळींची संख्या २१९७ झाली. शनिवारी १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवर २८ हजार ८१ रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पनवेल, उरण तालुक्यांत ८४३ बाधित

पनवेल : पनवेल आणि उरण या दोन तालुक्यांत ८४३ जणांना लागण झाली आहे. यातील ५५८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. शनिवारी दोनही तालुक्यात नवे ३४ रुग्ण आढळले. तर मृतांचा आकडा ३२ वर पोचला आहे. पनवेल पालिका क्षेत्रात ४९६, तर ग्रामीण क्षेत्रात ३४७ बाधित आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 31, 2020 4:30 am

Web Title: 1510 new covid 19 positive patients in mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/1510-new-covid-19-positive-patients-in-mumbai-zws-70-2175078/