मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेत कोविड-१९ उपचारासाठी डॉक्टर,नर्सेस यांना मानधन तत्वावर घेण्याचे आदेश – Zee २४ तास

लातूर : देशातील सर्वाधित कोरोनाग्रस्त मुंबईत आहेत. मुबंईत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने त्यांना मानधन तत्वावर कोरोना संकटाच्या काळात घेण्यात यावे असे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

ज्या डॉक्टरांचं वय 45 वर्षापेक्षा कमी आहे आणि ज्यांना कुठलाही आजार नाही, ज्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे अशा डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोरोना कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा 80 हजार रुपये मानधन दिले जाईल. डॉक्टरांप्रमाणे फिजिशियन यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. भूलतज्ञ आणि इंटेन्सिविस्ट यांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.

मुंबईतील नर्सेसची कमतरता भरुन काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. ज्या नर्सेसनी बीएससी किंवा जी.एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे, ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे अशा नर्सेसना दरमहा 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. डॉक्टर आणि नर्सेस यांना हे मानधन मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणार आहे. 

यासाठी पात्र असलेल्या डॉक्टरांनी https://forms.gle/PtCY3SvhvEA43WxV6 या लिंकवर आणि पात्र नर्सेस https://forms.gle/81LcWWajq1WNQ6cK8 यावर अर्ज करु शकतात असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

राज्याच कोरोनाबाधितांचा आकडा वाढून 65 हजार 168 पर्यंत पोहोचला आहे. तर एकट्या मुंबईत आतापर्यंत 38 हजार 442 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 1227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 16 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Source: https://zeenews.india.com/marathi/maharashtra/order-to-hire-doctors-and-nurses-on-honorarium-basis-for-treatment-of-kovid-19-in-mumbai-municipal-corporation/522169