मुंबई बातम्या

Big Breaking : मुंबई, पुण्यातील लॉकडाउनबाबत झाला निर्णय; अधिकारीही लागले कामाला – Sakal

पुणे : कोरोनाच्या रुग्णांची मुंबई आणि पुण्यातील वाढती संख्या लक्षात घेता किमान या दोन शहरांसाठी लॉकडाउन वाढणार असल्याचे राज्य सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध करतानाच उर्वरित भागात आणखी शिथिलता कशी देईल, यावर सध्या विचारविनिमय सुरू असल्याची माहिती आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बड्या नेत्यांमध्ये चर्चा
राज्यात आज सर्वाधिक म्हणजे 2 हजार 598 हजार रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच एका दिवसांत मृत्यमुखी पडणाऱयांचीही संख्या आता 85 पेक्षा जास्त झाली आहे. पुण्यातही 318 रुग्ण एका दिवसांत सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकाची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रमुख मंत्री यांची गुरुवारी चर्चा झाली. त्यात या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने काहीही निर्णय घेतला तरी, राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आपण दिशा ठरविली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाले.

आणखी वाचा – पुण्याची स्थिती चिंताजनकच; कंटेन्मेंट झोनबाहेर पसरतोय कोरोना

शेतीचे कामे आणि लॉकडाउन
पुढील महिन्यात राज्यात शेतीची सर्वदूर कामे सुरू होतील. त्या काळात लॉकडाउन परवडणारा नाही. तसेच राज्याचीच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाऊस सुरू होण्यापूर्वी काळजी घेण्याचा हा शेवटचा ऑप्शन आहे. तसेच पुण्यातही परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी आणखी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील लॉकडाउन वाढवावा लागेल, असा सूर बैठकीत उमटला.

आणखी वाचा – माऊली कशी असेल यंदाची वारी?

पिंपरी-चिंचवड मॉडेलचा विचार
राज्यातील अन्य शहरांत परिस्थिती सामान्य असेल तर पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर तेथे काही टप्प्याटप्प्याने शिथिलता देता येईल. पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीची बससेवा सुरू झाली आहे. तसेच व्यावसायिकांना व्यवसायासाठीची वेळही वाढविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या काही भागात सलूनच्या दुकानांनाही परवानगी दिली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक सरसकट सुरू करता येणार नाही तसेच बार, हॉटेल, मॉल, चित्रपटगृहे बंदच ठेवावी लागतील, अशीही या वेळी चर्चा झाली.

आणखी वाचा – कोरेगावात चोरपावलाने शिरला कोरोना

अधिकारी लागले कामाला
या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात लॉकडाउन किमान 15 दिवसांपुरता कायम ठेवायचा. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर शिथिलता वाढवायची, असे नियोजन प्रशासकीय अधिकाऱ्यांना करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. राज्यात कोरोनाचा उद्रेक विशिष्ट शहरांत झाला आहे. त्यामुळे तेथे शिथिलता देऊन मुंबई- पुणे पॅक ठेवण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन सध्या या दोन शहरांतच आहेत. त्यामुळे तेथे या बाबतच्या उपाययोजना आवश्यक आहे. त्याचबरोबर कंटन्मेंट झोनच्या बाहेर व्यवसाय- उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अनेक व्यावसायिक आता  आर्थिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतही सकारात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, असाही सूर या बैठकीत उमटल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.  

Source: https://www.esakal.com/pune/coronavirus-mumbai-pune-lockdown-may-extend-299332