मुंबई बातम्या

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची केवळ अफवा – Zee २४ तास

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठीबंद राहणार आहेत. तसेच पूर्णत: लष्कराच्या लॉकडाऊनमध्ये असणार अशी सावध करणारी एक बातमी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार व्हायरल होत आहे. यात महाराष्ट्र सरकारची एक बैठक सध्या सुरु असून कोणत्याही क्षणी पूर्णपणे बंदचा निर्णय घेतला जाईल, असे या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. मात्र, या पोस्टबाबत राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही बातमी पूर्णपणे खोडसाळ असून अफवा पसरविण्याच्या उद्देशाने ती पोस्ट केली असून ती फिरविण्यात येत आहे, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन ४.० सध्या सुरु आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कल्याण-डोंबिवली आदी शहरात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरु असताना मुंबई आणि पुणे येथे रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण रोखण्यासाठी शनिवारपासून १० दिवस संपूर्णपणे मुंबई आणि पुणे शहरे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी पोस्ट फिरत आहे. ही पोस्ट खोडसाळ आणि चुकीची तसेच अफवा पसरविणारी आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. यावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुपटीचा वेग १४ दिवसांवर – मुख्य सचिव

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) १४ दिवसांवर आणण्यात यश आले आहे. मुंबईमध्ये ७५ हजार खाटा तयार असून कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम राबविली जात आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत असून राज्यात लवकरच २७ नवीन प्रयोगशाळा सुरु होतील. त्यामुळे राज्यातील प्रयोगशाळांची संख्या १००  होणार आहे, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल येथे दिली.

कम्युनिटी लीडर नेमले – मुंबई पालिका आयुक्त

तसेच मुंबई महापालिका परिसरातील मृत्यूदर हा सध्या ३.२ टक्के असून तो ३ वर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईत ३१ हजार ७८९ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यातील ८ हजार ४०० रुग्णांना घरी सोडण्‍यात आले आहे. सध्या २२ हजार रुग्णांचर उपचार सुरु असून त्यातील १५ हजार ८०० रुग्णांना लक्षणे नाहीत. मुंबईत कॉन्टक्ट ट्रेसींगवर भर देण्यात येत असून त्यासाठी ‘चेस द व्हायरस’ ही नवी मोहीम हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट सहवासातील १५ जणांना सक्तीने संस्थात्मक कॉरंटाईन केले जाणार आहे. कम्युनिटी लीडर नेमले असून त्यांना सहा प्रकारचे काम नेमून देण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त आय.एस.चहल यांनी दिली आहे.

राज्यात सध्या ३५ हजार १७८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ९ मार्चपासून आतापर्यंत ५२ हजार ६६७  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १५ हजार ७६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी तीन दिवसांवरुन १४ दिवसांवर आणण्यास यश मिळाले आहे. लोकांमधील जागरुकता आणि लॉकडाऊनमुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढविणे शक्य झाले आहे.  राज्यात टेस्टींग, ट्रेसींग आणि आयसोलेशन या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला.

९ मार्चला राज्यात केवळ दोन प्रयोगशाळा होत्या आज  ७२ प्रयोगशाळा कार्यान्वित असून नव्याने २६ लॅब येत्या काही दिवसात कार्यान्वित होतील. त्यामध्ये रत्नागिरी येथे एक, आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि १८ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या प्रयोगशाळा सुरु होतील. मार्चमध्ये दिवसाला ६०० ते ७०० चाचण्यांची असणारी क्षमता १३हजारांहून अधिक झाली आहे.

 राज्यात सर्वेक्षण पथकांची संख्या दिवसांगणिक वाढत असून सध्या  १६ हजार सर्वेक्षण पथक कार्यरत असून ६६ लाख लोकांचे सर्वेक्षण आतापर्यंत झाले आहे. कॉन्टॅट ट्रेसींगवर भर दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये यश मिळाले आहे. राज्याचा मृत्यूदर एप्रिलमध्ये ७.६ एवढा होता. तो आता ३.३५ टक्के इतका खाली आला आहे, अशी माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी  दिली.

कोरोनावर उपचारासाठी ११ तज्ज्ञ डॉक्टरांचे कृतीदल नेमण्यात आले आहेत. त्यांनी उपचाराचा प्रोटोकॉल तयार केला. तो सर्व जिल्ह्यांना देखील पाठविण्यात आला. हे डॉक्टर्स २४ तास उपलब्ध असून कुठल्याही जिल्ह्याला उपचाराबाबत आवश्यकता असल्यास ते त्यांना संपर्क करु शकतात.राज्यातील  २० टक्के रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता असून तर १० टक्के रुग्णांना आयसीयूची गरज आहे. राज्यात तीन हजार व्हेंटीलेटर उपलब्ध असून अतिदक्षता विभागातील ८ हजार ४०० बेड्स उपलब्ध आहेत. राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या एक हजार रुग्णालयातून मोफत उपचार मिळतील. राज्यातील ९५ टक्के कोरोना रुग्ण महापालिका क्षेत्रातील असून त्यातील ७०टक्के रुग्ण मुंबई व परिसरातील आहेत.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/only-rumors-that-mumbai-pune-will-be-completely-closed-maharashtra-government/521676