मुंबई बातम्या

मुंबईकरांमुळे पुणेकर धोक्यात…कोरोनाचा सुरू आहे मुंबई- पुणे- मुंबई प्रवास – Sakal

पुणे : मुबंईत कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुंबईतून अनेक नागरिक गावाकडे येत आहेत. पण, तेच नागरिक पुन्हा मुंबईला कामानिमित्त जात आहेत. तसेच, तेथून परत गावालाही येत आहेत. त्यामुळे एकप्रकारे कोरोनाचा मुंबई- पुणे- मुंबई असा प्रवास सुरू आहे. या प्रकारांमुळे पुणे जिल्ह्यात मुंबई कनेक्शन असलेले कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. 

पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाने लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपेपर्यंत कोरोनाला बऱ्यापैकी रोखले होते. परंतु, चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर परजिल्ह्यातील, विशेषतः मुंबई परिसरातून अनेक नागरिक आपापल्या गावाकडे परतले. त्यांच्या सोबतीने कोरोनानेही गावांमध्ये प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये मुंबईकरांच्या रूपाने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. एकप्रकारे मुंबईकर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी धोकादायक ठरत आहेत.

 नवीन बांधकाम प्रकल्प नियमावलीत अडकले; जुनी वापरता येईना, तर नवीन प्रसिद्ध होईना!

भोर : भोर तालुक्‍यात कोरोनाचा शिरकाव मुंबईतील नागरिकांमुळे झाला आहे. व्यवसाय व नोकरीनिमित्त मुंबईला असलेले नागरिक लॉकडाउननंतर आपापल्या गावी आल्यावर दहा- पंधरा दिवसानंतर त्यांना कोरोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. नेरे येथे 14 एप्रिलला तालुक्‍यातील पहिला रुग्ण आढळला. 53 वर्षांचा तो रुग्ण 1 एप्रिलला मुंबईहून आपल्या मूळगावी नेरे येथे आला होता. त्याच्यामुळे त्याच्या 17 वर्षीय पुतणीलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 2 मे रोजी नसरापूर येथील पीएमपी चालक कोरोनाग्रस्त झाला होता. तो पुण्यात मुंबईतील कोणाच्यातरी संपर्कात आलेला होता. त्याच्यामुळे त्याच्या पत्नीसही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईहून रायरी या मूळगावी आलेल्या 36 वर्षीय तरुणास 21 मे रोजी कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. त्याची पत्नी व दोन मुलींनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी (ता. 24) आला. त्यांच्या सोबत मुंबईहून आलेला रायरीतील रेणुसेवाडीतील तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी (ता.. 25) आला. तसेच, बाजारवाडीतील मानकरवाडी येथील तरुण काही दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आला होता. तेव्हापासून तो होम क्वारंटाइन होता. मात्र, त्याचा कोरोना रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा     

दौंड : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सात व पाच च्या विविध तुकड्या मुंबई येथे बंदोबस्ताला होते. त्यापैकी मुंबई मधील शिवाजीनगर येथे बंदोबस्ताला असलेल्या गट क्रमांक सात मधील 27 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. उपचारानंतर एकूण 25 पोलिसांनी त्यावर मात केली असून उर्वरित दोन पोलिसांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. दौंड शहरातील इंडियन रिझर्व्ह बटालियन (आयआरबी) गट क्रमांक सोळाच्या तुकड्या मुंबई येथे राजभवन वर बंदोबस्ताला होत्या. बंदोबस्त करून परतल्यानंतर 15 जणांना कोरोनाची बाधा झाली असून या 15 पोलिसांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सासवड : पुरंदर तालुक्‍यातील श्री क्षेत्र वीर येथे 20 मे रोजी आढळलेला कोरोनाचा रुग्ण मुंबई कनेक्‍शनमधील आहे. हा रुग्ण मुंबई पोलिस दलात प्रशिक्षणार्थी शिपाई असून, सांताक्रूझ येथील कलीना कॉलनीमधील रहिवासी आहे. खासगी लॅबच्या तपासणीत तो बाधित आढलला; मात्र सरकारी रुग्णालयात प्रकृतीअभावी स्वॅप घेणे शक्‍य नसल्याने अजूनही त्याची तपासणी बाकी आहे. 
मुंबईतील त्याच्या कॉलनीत रुग्ण सापडल्याने व काहींना त्रास सुरू झाल्याने; भीतीने खासगी वाहनातून तो 16 मे रोजी वीर येथे आला. त्याने शंका म्हणून 18 मे रोजी स्वत:हून प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर लोणीला खासगी रुग्णालयात गेला. खासगी लॅबचा रिपोर्ट 20 रोजी पॉझिटिव्ह आला. तेव्हापासून तो औंधला रुग्णालयात उपचार घेत आहे. पत्नीला त्रास होत होता; पण ती निगेटिव्ह आहे. त्याच्या संपर्कातील 8 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तसेच, मुंबईतील भायखळा परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे तेथील किराणा दुकान चालविणारा आपल्या आई, वडील, पत्नी व मुलीसह आपल्या कोडीत या मूळगावी आला होता. या कुटुंबाला संस्था क्वारंटाइन केले होते. मात्र, किराणा दुकानदाराचा शनिवारी (ता.. 23) रात्री कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

बारामती : बारामती तालुक्‍यातील तीन कोरोनाग्रस्तांचे मुंबई कनेक्‍शन आहे. या पैकी तालुक्‍यातील मुर्टी येथील माथाडी कर्मचारी असलेल्या रुग्णाला व त्याच्या मुलालाही मुंबईहून आल्यानंतरच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे; तर वडगाव निंबाळकर येथील एका ज्येष्ठ महिलेलाही मुंबईहून परतल्यानंतरच कोरोनाची लागण झाली होती. परगावातून विशेषतः मुंबई व पुण्यातून येणाऱ्या लोकांकडूनच कोरोना बारामतीत येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जुन्नर : जुन्नर तालुक्‍यात गेले दोन महिने कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या भीतीने अनेक कुटुंबांनी गावी धाव घेण्यास सुरवात केली आहे. यातून तालुक्‍यातील तीन गावात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. धोलवड येथे 14 मे रोजी रात्री आलेल्या सहा जणांच्या कुटुंबाला होम क्वारंटाइन केले होते. त्यातील पती- पत्नी दोन दिवस गावी थांबून नोकरीमुळे मुंबईला गेले. तेथे त्रास होऊ लागल्याने 19 मे रोजी दोघांची तपासणी केली. त्यात दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच जुन्नर प्रशासनाने धोलवड येथे असणाऱ्या चौघांना तपासणीसाठी वायसीएम येथे दाखल केले. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच, सावरगाव येथे 19 मे रोजी आलेल्या एका कुटुंबातील चौघांपैकी दोघे पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या संपर्कातील तेरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापाठोपाठ मांजरवाडी येथे मुंबईहून आलेल्या एक तपासणीनंतर कोरोनाबाधित आढळून आला आहे. 

शिरूर : शिरूर तालुक्‍यातील टाकळी हाजी, कवठे येमाईबरोबरच पश्‍चिम पट्ट्यातील अनेक लोक मुख्यत्वे करून भाजीपाला, मासेमारी या व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांनी कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईतून पळ काढला. कवठे येमाई परिसरात आतापर्यंत चार कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून, ते सर्व मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आहेत. त्यांना औंध रुग्णालयात हलविले आहे. धारावी झोपडपट्टीतून टाकळी हाजी येथे बेकायदेशीरपणे आलेल्या 15 जणांना पकडून गावच्या शाळेत क्वारंटाइन केले आहे. नगर जिल्ह्यातील निघोज येथून नदी पार करून ते रात्रीच्या वेळी टाकळीत आले होते. तसेच, मुंबईतील कांदिवली येथून म्हसे बुद्रुक येथे आलेल्या कुटुंबातील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.  

राजगुरुनगर : खेड तालुक्‍यात 4 मेपासून 23 मेपर्यंत मुंबईहून 7527 नागरिक आले आहेत. त्यामुळे खेडमध्ये धोका वाढण्याचे संकेत होते आणि ते खरेही ठरले. वडगाव पाटोळे येथे मुंबईहून आलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल (ता.. 25) मिळाला. त्यामुळे त्यांच्याबरोबर मुंबईहून आलेले त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या पाचजणांना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. कडूसमध्ये मुंबईहून येऊन पुन्हा मुंबईला गेलेला एकजण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मुंबईहून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कडुसमधील 6 जणांनाही काल चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच कडूसमध्येच मुंबईवरून आलेल्या अजून एकास लक्षणे आढळल्याने 25 मे रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच, काल रात्री मुंबईहून चासजवळच्या पापळवाडी येथे आलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या मिळून 9 व्यक्तींना आज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईहून खेड तालुक्‍यात आलेले 3 जण आतापर्यंत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

मंचर : आंबेगाव तालुक्‍यात निरगुडसर, जवळे, साकोरे व शिनोली येथे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेले एकूण सहा रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले आहेत. त्यापैकी पाच रुग्ण सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईचे कनेक्‍शन आंबेगावकरांना महागात पडले आहे. आंबेगाव तालुक्‍यातील साकोरे गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. हा रुग्ण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. मुंबईत सासुरवाडीत राहत होता. त्याच्या मेहुण्याचा कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल पॉंझिटिव्ह आला. त्याने ताबडतोब सासू, सासरे व त्यांच्या दोन नातींना प्रथम कवठे यमाई (ता.. शिरूर) येथे सोडले. पत्नीसह ते मूळ साकोरे गावी आले. कॅब चालक शिनोलीत आले. त्यांच्यासह एकूण तीन जणांचा कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. निरगुडसर व जवळे येथे आलेल्या दोन्ही रुग्णाचे वास्तव्य मुंबई परिसरातच होते. शिनोली, जवळे, निरगुडसर, साकोरे या चारही गावच्या सीमा सील केल्या आहेत. गावात गावकरी लॉकडाउनची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. सोमवारी (ता. 25) पाठवलेल्या तीन जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 

इंदापूर : इंदापूर तालुक्‍यातील शिरसोडी व पोंदकुलवाडी येथे मुंबईवरून आलेल्या 4 नागरिकांना कोरोनाची लागण असल्याचे घोषित झाली. त्यानंतर तालुक्‍यात खळबळ उडाली. त्यातच पुणे येथून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास लागण असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तालुका हवालदिल झाला होता. मात्र, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांच्या कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे तालुक्‍यास दिलासा मिळाला आहे. 

Source: https://www.esakal.com/pune/citizens-mumbai-are-raising-corona-pune-district-298149