मुंबई बातम्या

कोरोना मुंबई : लोकल ट्रेन्समधला प्रवास भविष्यात कसा असेल? – BBC News मराठी


मुंबई तेव्हाच थांबते, जेव्हा इथली लोकल ट्रेन थांबते. पण कोव्हिड-19च्या साथीमुळे मुंबईकर घरी बसले आहेत आणि गेले दोन महिने इथली लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंद आहे.

लोकल ट्रेन कधी सुरू होतील, असा प्रश्नही मुंबईकर विचारत आहेत. एरवी दररोज 75 लाख लोक लोकल ट्रेननं प्रवास करतात. मुंबईतच नाही, तर लंडन, न्यूयॉर्क, टोकियो अशा शहरांतही सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून असतात.

पण ‘Post-Covid’ म्हणजे कोव्हिडोत्तर काळात ही सार्वजनिक वाहतूक, विशेषतः मेट्रो किंवा लोकल ट्रेनसारख्या उपनगरीय रेल्वेवर काय परिणाम होऊ शकतो का? नजीकच्या भविष्यातली मुंबईची लोकल ट्रेन कशी असेल? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

मुंबईच्या लोकल ट्रेन कधी सुरू होतील?

22 मार्चला भारतीय रेल्वे प्रशासनानं देशभरातली प्रवासी वाहतूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. पण आता गेल्या काही आठवड्यांत श्रमिक एक्सप्रेस आणि विशेष राजधानी ट्रेन्स सुरू केल्या आहेत. तसंच दोनशे नॉन-एसी गाड्या लवकरच देशभरात रुळांवर उतरणार आहेत. मग लोकल ट्रेन कधी सुरू होणार?

तसं मंगळवारीच मुंबईत मध्य रेल्वेनं फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मेन लाईन आणि हार्बर लाईनवर विशेष लोकल सुरू केल्या आहे. या गाड्या कसारा, कर्जत आणि पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत दिवसाला एकूण आठ फेऱ्या करणार आहेत.

पण सर्वसामान्यांना लोकल ट्रेन्स सुरू होण्यासाठी अजून बराच काळ वाट पाहावी लागू शकते, असं रेल्वेविषयी वार्तांकन करणारे पत्रकार आणि ‘अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ इंडियन रेल्वेज’ या पुस्तकाचे लेखक राजेंद्र आकलेकर सांगतात.

ते म्हणतात, “कोरोनाची साथ संपल्यावर गोष्टी पूर्वपदावर येण्यासाठी वर्षभरही जाऊ शकतं. सध्या स्थलांतरीतांसाठीच्या श्रमिक एक्सप्रेस आणि काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या राजधानी ट्रेन्स या एक प्रकारे ‘टेस्टिंग ट्रेन्स’ आहेत. भविष्यातला रेल्वे प्रवास कसा असेल, ते या ट्रेन्सवरून दिसून येऊ शकतं. पण पॅसेंजर ट्रेन्सची तुलना लोकलशी करता येणार नाही.”

लोकल ट्रेन कधी सुरू होणार, हे स्पष्ट नाही. तरी रेल्वे प्रशासन सध्या गाड्या आणि ट्रॅक्स तसंच ओव्हरहेज वायर्स अशा गोष्टींची देखभाल करते आहे, म्हणजे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला, तर काही दिवसांत त्या अवघ्या सुरू करता येतील.

सध्या रेल्वे प्रवास कसा सुरू आहे?

मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सध्या रेल्वे वाहतूक कशी सुरू आहे याविषयी माहिती दिली आहे.

“नोंदणी केलेल्या आणि परवाना मिळालेल्या लोकांनाच या श्रमिक ट्रेननं दुसऱ्या राज्यात जाता येतं. स्टेशन परिसरात येण्याआधी लोकांची प्राथमिक तपासणी केली जाते, त्यासाठी सध्या राज्य सरकार आम्हाला मदत करत आहे. त्यानंतर प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगविषयी समुपदेशन केलं जातं ज्यात लाईनमध्ये अंतर ठेवून चालायला सांगणं, सीटवर अंतर ठेवून बसायला सांगणं या गोष्टींवर भर असतो. श्रमिक ट्रेनमध्ये मास्क घालणं बंधनकारक आहे.”

या गाड्यांचं वेळोवेळी निर्जंतुकीकरण केलं जातं. गाडी स्टेशनमधून निघाल्यावर स्टेशनचा परिसरही निर्जंतुक केला जातो आहे, असं शिवाजी सुतार सांगतात. आता यातल्या किती गोष्टी मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये लागू करता येतील?

भविष्यातला लोकल प्रवास कसा असेल?

“मुंबई म्हटलं की फक्त शहर नाही, विरार-डोंबिवलीपासून अगदी टोकाला राहणारे लोक इथे नोकरीसाठी ये-जा करतात. त्यांना सायकल किंवा स्वतःच्या गाडीनं प्रवास करणं शक्य होणार नाही. त्यामुळे इथे लोकल ट्रेन्स या टप्प्याटप्प्यानंच सुरू कराव्या लागतील आणि प्रत्येक वेळी परिस्थितीनुसार, परिणाम काय होतायत हे पाहून निर्णय घ्यावे लागतील, जेणेकरून संक्रमण वाढणार नाही,” असं राजेंद्र आकलेकर सांगतात.

त्यांनी सुचवलेल्या गोष्टींमध्ये रेल्वेला राज्य सरकारं आणि केंद्राचीही मदत लागू शकते. “कामाचे तास मर्यादित ठेवणं, ऑफिसच्या वेळा बदलणं, घरून काम कऱण्यास प्राधान्य देणं, अशा गोष्टी केल्या तर ट्रेनमधली गर्दी काही प्रमाणात नियंत्रणात आणता येईल.”

2012 साली ऑलिम्पिकदरम्यान लंडनच्या अंडरग्राऊंड ट्रेन्समध्येही हाच उपाय करण्यात आला होता. मुंबई अशा बदलांची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जाते आहे.

गर्दी कमी करण्यासाठी डब्यांची संख्या वाढवण्याचा पर्यायही आहे. “त्यामुळें लक्षणीय बदल नाही, पण काही प्रमामात तरी गर्दी कमी होऊ शकते. जेवढ्या सीट्स तेवढीच माणसं बसवायची, तर त्यासाठी जास्त गाड्या लागतील, जे सध्या शक्य नाही,” असं आकलेकर सांगतात. लोक लोकल ट्रेनऐवजी खासगी गाड्या आणि बाईकला प्राधान्य देऊ लागले, तर रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये वाढ होईल, असं त्यांना वाटतं.

दुसरीकडे ‘युरोपियन सेंटर फॉर डिसिझ प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल’ या संस्थेनंही कोव्हिडच्या साथीदरम्यान आणि त्यापुढच्या काळात सार्वजनिक वाहतूक कशी असायला हवी, याविषयी काही मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत.

प्रवाशांना सतत कोव्हिडच्या लक्षणांची माहिती दिली जावी

  • आजारी असल्यास प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळावा.
  • तिकीट खिडकीजवळ आणि एरवीही प्रवाशांनी अंतर राखून उभं राहावं.
  • प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर गर्दी जमा होऊ देऊ नये, किमान एक मीटर अंतर राखावं.
  • स्टेशन परिसर आणि गाडीत मास्कचा वापर बंधनकारक, कर्मचाऱ्यांनाही मास्क उपलब्ध करून दिले जावेत.
  • गाडीत एसीऐवजी हवा खेळती राहील याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी मोठ्या खिडक्या आणि छतावर झरोक्यांचा वापर करता येईल.
  • प्लॅटफॉर्म, टॉयलेट्स, वेटिंग एरिया आणि गाड्यांचे डबे वारंवार स्वच्छ आणि निर्जंतुक करावे लागतील. विशेषतः प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यावर शेवटच्या स्थानकात गाडी निर्जंतुक केली जाईल.
  • ठिकठिकाणी सॅनिटायझर किंवा हात धुण्याची सोय असेल, तर गाडीत चढण्यापूर्वी आणि उतरल्यावर लोक हात स्वच्छ करू शकतील.
  • केवळ मर्यादित स्टेशनांवर आणि कंटेन्मेंट झोनमध्ये गाडी थांबवली नाही, तर तिथले लोक गाडीत चढणार नाहीत.

अशा उपाययोजना मुंबईसारख्या शहरात लागू करणं हे खरं आव्हान आहे आणि प्रशासन आणि लोकांनी एकमेकांना साथ दिल्याशिवाय ते शक्य होणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.बीबीसी विश्वरोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-52759885