मुंबई बातम्या

COVID19 : मुंबई रिटर्नने वाढवली चिंता; या तालुक्यातही कोरोनाची एन्ट्री, गाव सिल – Sakal

मोताळा (जि.बुलडाणा) : आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण नसलेल्या मोताळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातील आव्हा येथील 22 वर्षीय युवक बुधवारी करोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर युवक मुंबई येथून परतला होता. त्याच्या कुटुंबातील आठ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.

तालुक्यातील आव्हा येथील 22 वर्षीय युवक 14 मे रोजी मुंबई येथून परत आला होता. दरम्यान, दुसर्‍या दिवशी त्याची तब्येत बिघडल्याने त्याला पिंपळगाव देवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

आवश्यक वाचा – सावधान! तुम्ही फसव्या लिंकवर तर क्लिक करीत नाही ना, सायबर हल्लेखोरांनी पसरवल्या आहेत फसव्या लिंक

दरम्यान, डॉक्टरांनी करोना संशयावरून त्याचा स्वॅब नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला होता. बुधवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तालुका प्रशासनाने तातडीने आव्हा गावात धडक देऊन गाव सील केला आहे. संबंधित युवकासह त्याच्या कुटुंबातील आठ जण सोबतच मुंबईवरून परत आले होते. त्याच वाहनात इतर भागातील आणखी काही जण जिल्ह्यात दाखल झाल्याचे समजते. 

दरम्यान, पॉझिटिव्ह आढळलेल्या युवकाच्या कुटुंबीयांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी बुधवारी सायंकाळी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. तर, त्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींचा शोध घेणे सुरू असून, रात्री उशिरापर्यंत सदर कार्यवाही सुरू राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, आव्हा गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महानगरातून परतणार्‍यांमुळे वाढली चिंता
मुंबई, पुणे, नाशिक यासह इतर मोठ्या शहरातून अनेक जण मूळगावी परत येत आहेत. त्यांची तपासणी न करता केवळ क्वारंटाईनचा शिक्का मारल्या जात आहे. परंतु काही जण हातावर क्वारंटाईनचा शिक्का असताना, बाहेर फिरताना दिसत आहेत. अनेक जण अवैध मार्गाने एन्ट्री करत असल्याने प्रशासनाकडे त्यांची माहितीच नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून, रेड झोनमधून गावाकडे परत येणार्‍या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

गुरुवारी मोताळा शंभर टक्के बंद
आतापर्यंत एकही कोरोना संसर्गित नसलेल्या मोताळा तालुक्यात कोरोनाची एन्ट्री झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तालुका मुख्यालय असलेल्या मोताळा शहराशी ग्रामीण भागातील नागरिकांचा दररोज संबंध येतो. दरम्यान, गुरुवारी मोताळा शहर शंभर टक्के बंद ठेवण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. त्यामुळे दवाखाने, मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता मोताळा शहर शंभर टक्के बंद राहणार आहे.

Source: https://www.esakal.com/vidarbha/mumbai-returns-raise-concerns-coronas-entry-motala-taluka-too-295812