मुंबई बातम्या

मुंबईत CISFचे ३०० जवान दाखल – Times Now Marathi

मुंबईत CISFचे जवान&  | & फोटो सौजन्य:&nbspRepresentative Image

थोडं पण कामाचं

  • थकलेल्या पोलिसांना विश्रांती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागितले केंद्रीय सशस्त्र पोलीस
  • महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने येणार केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या २० तुकड्या
  • मुंबईत CISFचे ३०० जवान दाखल

मुंबईः कोरोना संकट वाढत आहे आणि जवळपास २ महिन्यांपासून रस्त्यावर अहोरात्र बंदोबस्त करत असलेले पोलीस थकले आहेत. पोलिसांना विश्रांती देण्यासाठी मुंबईत सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांना नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत सीआयएसएफच्या ३०० जवानांचा ताफा दाखल झाला आहे. 

मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये नियुक्ती

सीआयएसएफचे जवान प्रामुख्याने मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. दादर, शिवाजी पार्क, धारावी, गोवंडी, शिवाजी नगर, चीता कँप, कुर्ला आणि डी. एन. नगर या पट्ट्यात सीआयएसएफचे जवान नियुक्त करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून मुंबईत पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. लवकरच केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या आणखी तुकड्या राज्यात येणार आहेत. ठाकरे सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या २० तुकड्या मागवल्या आहेत. पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने या तुकड्या महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. 

कोरोनामुळे अनेक पोलीस आजारी

महाराष्ट्रात आतापर्यंत १३८८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ९४८ पोलीस अद्याप उपचार घेत आहेत तर ४२८ पोलीस बरे झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात १२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबई मनपाच्या हद्दीत ६००पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण

कोरोनाबाधीत पोलीस आणि त्यांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाईन झालेले पोलीस यामुळे राज्यातल्या पोलिसांचे मनुष्यबळ कमी झाले आहे. राज्यात काही ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहेत. या घटनांमुळे पोलिसांवर कामाचा ताण आणखी वाढला आहे. रमझान ईद जवळ येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्रात केंद्रीय सशस्त्र पोलिसांची कुमक नियुक्त केली जात आहे.

बातमीची भावकी

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २५ मार्चपासून सर्व राज्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या जाहीर करायला सुरुवात केली आहे. ही आकडेवारी जाहीर करायला सुरुवात केल्यापासून महाराष्ट्र कोरोना रुग्णांच्या बाबतीत अव्वलस्थानी आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे ३७,१३६ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ९६३९ जण बरे झाले आहेत तर १३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अद्याप २६,१७२ कोरोनाबाधीत रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई मनपाच्या हद्दीत आतापर्यंत कोरोनाचे २२,७४६ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४,३५२ जण बरे झाले आहेत तर ८०० जणांचा मृत्यू झाला आहेत. मुंबईत अद्याप १७,५९४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. या समस्येवर उपाय करण्यासाठी कंटेनमेंट झोन आणि रेड झोनमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. 

दीर्घ काळापासून अविश्रांत काम करणाऱ्या पोलिसांना हे आव्हान पेलणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलिसांचे जवान दाखल होत असल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/300-cisf-jawan-on-duty-in-mumbai/294289