मुंबई बातम्या

मुंबईतील कचरा प्रश्न चिघळण्याची शक्यता, स्वच्छता विभागाचे कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या तयारीत – TV9 Marathi

मुंबई : ऐन ‘कोरोना’ संकटात मुंबईतील कचरा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बीएमसी मुख्यालयाच्या इमारतीबाहेर मोठे आंदोलन सुरु केले आहे. (Mumbai BMC Contract Based Cleaning Staff Protest)

मुंबई महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारण्याच्या पवित्र्यात आहेत. महापालिका मुख्यालयाबाहेर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनबाहेर असलेल्या मुख्यालयासमोर कर्मचारी जमले आहेत.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर कचरा उचलणाऱ्या गाड्या धडकल्या आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी पीपीई किट्स, मास्क मिळत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.

जोखीम भत्ता मिळत नाही, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार विमा सुरक्षा कवचसुद्धा मिळालेले नाही, असा दावा मुंबई महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली आहे.

सफाई कर्मचाऱ्यां पीपीई किट्स, मास्क आणि सुरक्षेच्या अन्य साधनांविषयी अनेकदा मागणी करुन निवेदने दिली, मात्र तरीही प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पालिकेकडे पाठपुरावा केला.

‘कोरोना’ प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे. मुंबई शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले, तर कचरा प्रश्न चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नुकतीच मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी इक्बाल सिंग चहल यांची वर्णी लागली. भारतीय प्रशासकीय सेवेचा 31 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या इक्बाल चहल यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Mumbai BMC Contract Based Cleaning Staff Protest)

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-bmc-contract-based-cleaning-staff-protest-at-bmc-headquarter-219068.html