मुंबई बातम्या

मोठी बातमी : `मुंबई लोकल ट्रेन सुरु करा` – Zee २४ तास

मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याच्या काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्याही ऐकल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावेळी पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली. 

कोरोना व्हायरसशी देश, राज्य आणि मुंबईचा लढा सुरु असताना या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी आणि बेस्ट सेवा सुरु आहे. पण, या बसेसची संख्या तुलनेने कमी आहे, त्यामुळे ही समस्या कर्मचाऱ्यांपुढे आहे. परिणामी लोकल ट्रेन सुरु करावी अशी विनंतीपर मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

वाचा : मुलाकडे BMW पण वडिलांकडे एकही कार नाही; जाणून घ्या ठाकरे पितापुत्रांची संपत्ती 

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र पाहूनच त्यांना लोकलमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

कोरोनाचा प्रादपर्भाव वाढू लागताच २२ मार्चपासून आजतागायत मुंबईत लोकल धावलेली नाही. रेल्वे इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. पण, आता मात्र हे चित्र काही अंशी बदलण्यासाठी खुद्द मुख्यमंत्रीसुद्धा प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच राज्यात आणि आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईपुढे असणाऱ्या अडचणी पाहता मुख्यमंत्र्यांनी लोकल पुन्हा सुरु करण्याची ही मागणी पंतप्रधानांकडे केल्याचं स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही मागणी पाहता आता केंद्राकडून यावर कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/cm-uddhav-thackeray-requests-to-resume-mumbai-local-service-for-emergency-service-staff-in-video-conferencing-meet-with-prime-minister-narendra-modi-coronavirus-covid-19-lockdown/519759