मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेची करोनाशी लढाई स्वबळावर – Loksatta

इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक चाचण्या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येची तुलना इतर राज्यांतील शहरांशी केली जात आहे आणि त्यावरून मुंबई महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागत आहे. परंतु या सर्व शहरांच्या तुलनेत एका राज्याइतका व्याप असलेल्या मुंबईची करोनाशी लढाई मात्र स्वबळावर सुरू आहे. अन्य राज्यांमध्ये मिळून जितक्या चाचण्या करण्यात आल्या त्यापेक्षाही अधिक चाचण्या एकटय़ा मुंबईत करण्यात आल्या आणि त्यादेखील पालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या प्रयोगशाळेत!

करोनाच्या आजाराशी सर्वच शहरांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. मात्र मुंबईच्या पुढय़ात वाढून ठेवलेली आव्हानेसुद्धा एका राज्याइतकीच गुंतागुंतीची आहेत. कमी क्षेत्रफळावर असलेली प्रचंड लोकसंख्या, दाटीवाटीच्या वस्त्या हा करोनाच्या लढाईतील सर्वात मोठा अडथळा आहे. अन्य शहरांमध्ये रुग्ण संख्या कमी असल्याबद्दल मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढण्यात आले आणि त्याचा राजकीय वापर देखील केला गेला. मुंबईतील कर्मचाऱ्याना आपल्या हद्दीत प्रवेश न देण्याचा पवित्रा घेऊन अन्य महापालिकांनी मुंबई एकटे पाडण्याचा प्रयत्न देखील केला.

दिल्ली, चेन्नई, बंगळूर अशा सर्व शहरांशी मुंबईची तुलना होत असली तरी या सर्व शहरांचे पालकत्व स्वीकारून त्यांना त्यांच्या राज्यांची मदत होत असते. मुंबई महापालिकेने मात्र स्वखर्चाने प्रयोगशाळा, कोविड काळजी केंद्र अशी सगळी यंत्रणा उभारुन करोनाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात रुग्ण संख्या वाढेल ही शक्यता गृहीत धरून ७० हजार खाटा तयार ठेवाव्या लागणार असल्या तरी त्या करिता जागा शोधणे हे सुद्धा मुंबई महापालिकेपुढचे मोठे आव्हान आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात ७ मे पर्यंत १ लाख ९० हजार चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी १ लाख चाचण्या या फक्त मुंबईतील आहेत. त्यातून  १२ हजारापर्यंत रुग्ण आढळले आहेत.  रुग्णांच्या बाबतीत अन्य राज्याशी तुलनाच करायची झाली तर मुंबईतील मृत्युदर हा इतर सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे ३.९ टक्के इतका आहे. दाटीवाटीच्या वस्त्या असलेल्या मुंबईत क्षेत्र प्रतिबंधित करणे हे एक आव्हान आहे. इमारती बरोबरच बैठय़ा वसाहती, चाळी आणि एकदम खेटून घरे असलेल्या झोपडपट्टय़ा मध्येही पालिकेने प्रतिबंधित क्षेत्रे तयार केली आहेत. एकूण २००० प्रतिबंधित क्षेत्रांपैकी ७९२ क्षेत्र ही अशा दाटीवाटीच्या ठिकाणची आहेत. याच ठिकाणी सर्वाधिक म्हणजे ४०१७ रुग्ण आढळले आहेत.

केंद्रीय पथकाने मे अखेर पर्यंत मुंबईत ७० हजार रुग्णांसाठी खाटा तयार ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पालिकेने नियोजन सुरू केले असून येत्या काळात नायर रुग्णालयात ९३५ खाटांची सोय होणार आहे. त्यात ६५ खाटा गर्भवतीसाठी राखीव असतील.

चाचण्या

पश्चिम बंगाल —३२,७५२

केरळ — ३५,१७१

दिल्ली — ६६,२३४

गुजरात — १,००,५५२

मुंबई — १,०५,८९१

राजस्थान — १,४५,५१०

आंध्रप्रदेश — १,४९, ३६१

महाराष्ट्र — १,९०, ८७९

तामिळनाडू — २,०२, ४३६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 11, 2020 3:36 am

Web Title: bmc done most covid 19 tests compared to other cities in mumbai zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/bmc-done-most-covid-19-tests-compared-to-other-cities-in-mumbai-zws-70-2158093/