मुंबई बातम्या

मोठी बातमी: मुंबईत इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी – Zee २४ तास

मुंबई: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत असलेले लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा शिथिल करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी रात्री उशीरा यासंदर्भातील आदेश काढले. त्यानुसार आजपासून शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. प्रत्येक रस्त्यावरील एक इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअरचे दुकान उघडता येईल, असे या आदेशात म्हटले आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असलेल्या व्यापाऱ्यांना काही अंशी दिलासा मिळू शकतो. अनेक अत्यावश्यक आणि जीवरक्षक वैद्यकीय उपकरणे, अद्यायावत यंत्रणा, मशीन्स, वाहने यात बिघाड झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर दुकाने सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतल्याचे समजते. 

 ‘मनपाच्या निर्णयावर दुकानदार नाराज, इतर दुकाने सुरु करा’

यापूर्वी ३ मेनंतर मुंबई रेड झोनमध्ये असूनही लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. त्यानुसार काही अटींसह दुकाने आणि वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, वाईन शॉपच्या बाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात होते. परिणामी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी तातडीने पुन्हा लॉकडाऊनच्या कडक नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मुंबईत केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु होती. 

मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७६९ नवे रुग्ण आढळून आले. तर २५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,५२७ इतका झाला आहे. मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाचे ६८ नवे रुग्ण आढळून आले. धारावीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७३३ इतका झाला आहे. याशिवाय, दादर आणि माहीम परिसरातील रुग्णांचा आकडाही वाढत आहे.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/electronic-and-hardware-shops-will-strate-in-mumbai-form-today-bmc-loosen-coronavirus-lockdown-007/519188