मुंबई बातम्या

मुंबई कोरोना कडेलोटाच्या टोकावर?, टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक म्हणतात… – Zee २४ तास

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे १५,५३५ रुग्ण आहेत. यातले एकट्या मुंबईत ९,९४५ जणांना कोरोना झाला आहे. कोरोनाची ही आकडेवारी बघता मुंबई कडेलोटाच्या टोकावर उभी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

‘कोरोनासारख्या आजारांच्या काळात एक पॅरोबोलिक कर्व्ह आहे. आपण त्याच्या वरच्या टोकाच्या थोडे आधी आहोत. पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी काही केस वाढणार आहेत,’ अशी भीती डॉक्टर संजय ओक यांनी व्यक्त केली. 

‘धारावीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले, यामध्ये ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांच्या रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण कमी आढळलं आहे. हे रुग्ण गंभीर असल्याचं आढळून आलं आहे, मात्र आपण अनेकांना वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत. धारावीमध्ये ज्या समस्या आहेत, त्याच मालेगावमध्येही आहेत. जागेची मर्यादा, घरात जास्त लोकं असणं, कमी जागेत जास्त लोकसंख्या, या सगळ्या अडचणी धारावी आणि मालेगावमध्ये आहेत,’ असं डॉक्टर संजय ओक म्हणाले. 

‘भविष्यात कोरोनासोबत या आजारांचा धोका’, डॉ.संजय ओक यांचा इशारा

‘मुंबईतील बेडची संख्याही आपण वाढवत आहोत. पण स्वतंत्र आणि लालफितीचा अडथळा नसलेलं आरोग्य प्राधिकरण निर्माण करण्याची वेळ आली आहे. हे सगळं संपल्यावर MMRDA-MSRDCच्या धर्तीवर असं आरोग्य प्राधिकरण तयार केलं पाहिजे, असा सल्ला डॉक्टर संजय ओक यांनी दिला. 

भारतात या ३ कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार, प्रयोगालाही मंजुरी

‘भविष्यकाळात आरोग्यासाठी जीडीपीच्या किमान ७ ते ८ टक्के खर्च केला पाहिजे. अमेरिकेमध्ये जीडीपीच्या १७-१८ टक्के खर्च आरोग्यावर केला जातो,’ असं डॉक्टर संजय ओक यांनी सांगितलं.

[embedded content]

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/corona-virus-task-force-head-doctor-sanjay-oak-on-situation-in-mumbai/519138