मुंबई बातम्या

मुंबई मनपा हद्दीत दारू विक्री बंद – Times Now Marathi

मुंबई मनपा हद्दीत दारू विक्री बंद&  | & फोटो सौजन्य:&nbspRepresentative Image

थोडं पण कामाचं

  • मुंबई मनपा हद्दीत बुधवार ६ मे पासून दारू विक्री बंद
  • मनपा आयुक्त प्रविण परदेशी यांचा आदेश
  • मुंबईत फक्त जीवनावश्यक वस्तू, किराणा, खाण्यापिण्याचे पदार्थ, औषधे, दूध, भाजी विक्री सुरू राहणार

मुंबईः मुंबई मनपाच्या हद्दीत बुधवार ६ मे पासून दारू विक्री बंद करण्यात आली आहे. आयुक्त प्रविण परदेशी यांनी हा निर्णय जाहीर केला.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रुग्णांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आहे. या परिस्थितीची जाणीव असूनही राज्य सरकारने महसूल मिळवण्यासाठी दारू विक्रीला परवानगी दिली होती. कंटेनमेंट परिसर सोडून राज्यातील सर्व रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्री करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. राज्यात ४ मे पासून दारू विक्री सुरू झाली. सलग दोन्ही दिवस दारू खरेदीच्या निमित्ताने मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसचा फज्जा उडाला. ग्राहकांच्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे कठीण झाले. काही ठिकाणी ज्या भागात गरिबांना अन्नाचे वाटप सुरू होते त्याच परिसरात दारू विक्री सुरू झाल्यामुळे मद्यप्रेमी आणि इतर नागरिक यांच्यात सोशल डिस्टंस राखणे अशक्य झाले.

बातमीची भावकी

सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून फिरा, सोशल डिस्टंस राखा या प्रशासनाच्या सूचना विसरुन दारू खरेदीसाठी गर्दी करण्यात आली. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांची मुंबई मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आणि दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. महामारी कायद्यानुसार मनपा हद्दीत पालिका आयुक्तांना असलेल्या अधिकाराचा वापर करुन आयुक्त प्रविण परदेशी यांनी मुंबई मनपाच्या हद्दीत दारू विक्री बंद केली. आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवार ६ मे पासून मुंबई मनपाच्या हद्दीत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहणार आहेत. नागरिकांना फक्त किराणा माल, दूध, भाजी, इतर अत्यावश्यक वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ (अन्न-पाणी), औषधे यांची खरेदी करता येणार आहे. इतर वस्तू विकणाऱ्या पाच दुकानांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण

देशात ४६,७११ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यात १५,५२५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रामध्ये राजधानी मुंबईत सर्वाधिक ९९४५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आढळलेल्या रुग्णांपैकी ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णांपैकी १६५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सुमारे पावणेदोन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी १ लाख ६२ हजार चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही!

कोरोना संकटातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेत असल्याचे राज्याच्यावतीने सांगण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/non-essential-shops-including-liquor-shops-to-remain-shut-in-mumbai/292026